|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » एटीपी फायनल्स स्पर्धा आता तुरिनमध्ये होणार

एटीपी फायनल्स स्पर्धा आता तुरिनमध्ये होणार 

वृत्तसंस्था/ लंडन

इटलीतील तुरिनमध्ये यापुढे वर्षअखेरीस होणाऱया एटीपी फायनल्सचे आयोजन होणार आहे. बुधवारी यासंदर्भात घोषणा करण्यात आली. आजवर ही स्पर्धा लंडनमध्ये आयोजित केली जात होती. आता 2021 ते 2025 पर्यंत ही स्पर्धा तुरिनमधील पाला अल्पिटूर स्टेडियमवर खेळविली जाणार आहे.

एटीपीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एटीपी फायनल्स स्पर्धेसाठी मँचेस्टर, सिंगापूर, टोकियो, लंडन यांची नावे होती. पण आम्ही तुरिनची निवड केली आहे. स्पर्धेच्या 50 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही स्पर्धा इटलीमध्ये भरविली जाणार आहे. पाला अल्पिटूर स्टेडियम 2005 मधील हिवाळी ऑलिम्पिकवेळी सुरू करण्यात आले. इटलीतील हे सर्वात मोठे इनडोअर स्टेडियम असून त्याची 12350 प्रेक्षकक्षमता आहे. 2009 पासून लंडनमध्ये दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जात होती आणि त्याला लोकप्रियताही मिळाली होती. सरासरी 25000 प्रेक्षक या स्पर्धेला प्रतिसाद देत असल्याचे दिसून आले आहे.

दर वर्षअखेरीस होणाऱया या स्पर्धेत एकेरीचे व दुहेरीचे पहिले आठ खेळाडू सहभागी होतात. त्यात गेल्या वर्षी 8.5 दशलक्ष डॉलर्स बक्षीस ठेवण्यात आले होते  आणि जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हने ज्योकोविचला चकित करून जेतेपद पटकावले होते. इटलीतील मिलान येथे 21 वर्षे व त्याखालील वयोगटाच्या अव्वल आठ खेळाडूंचा सहभाग असलेली नेक्स्ट जेन फायनल्स स्पर्धा मागील दोन वर्षे आयोजित केली होती. याशिवाय दरवर्षी मे मध्ये रोममध्ये 1000 मास्टर्स क्ले कोर्ट स्पर्धा आयोजित करण्यात येते. प्रेंच ओपनच्या तयारीसाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरते. ही स्पर्धा आयोजित करणारे तुरिन हे 15 वे शहर बनले असून 1970 मध्ये टोकियोत त्याची सुरुवात झाली होती. 13 वर्षे न्यूयॉर्कमध्ये, 6 वर्षे प्रँकफर्ट तर हॅनोव्हर, लिस्बन, सिडनी हय़ुस्टन, शांघाय येथेही ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.