|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » सायना, सिंधूचा विजयी प्रारंभ

सायना, सिंधूचा विजयी प्रारंभ 

आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप : समीर वर्माचीही विजयी सलामी, के.श्रीकांत पराभूत

वृत्तसंस्था/ वुहान (चीन)

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, पीव्ही सिंधू व समीर वर्मा यांनी आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये शानदार प्रारंभ करत पुढील फेरीत प्रवेश केला. दिग्गज खेळाडू किदाम्बी श्रीकांतला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले.

बुधवारी सलामीच्या लढतीत सिंधूने विजयी प्रारंभ करताना अवघ्या 28 मिनिटांत जपानच्या ताकाहाशी सयाकाला 21-14, 21-7 असा पराभवाचा दणका दिला. एकतर्फी झालेल्या या लढतीत सिंधूने शानदार खेळाचे प्रदर्शन करताना वर्चस्व गाजवले. आता, चौथ्या मानांकित सिंधूची पुढील लढत इंडोनेशियाच्या चोरिनिसाशी होईल. याशिवाय, अन्य एका लढतीत जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या सायना नेहवालने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना चीनच्या हॅन युईला 12-21, 21-11, 21-17 असे नमवले. ही लढत 46 मिनिटे चालली. प्रारंभी, चीनच्या हॅन युईने पहिला गेम जिंकत चांगली सुरुवात केली होती. पण, अनुभवी सायनाने जोरदार पुनरागमन करत दुसरा व तिसरा गेम जिंकत दुसऱया फेरीत प्रवेश मिळवला. तिची पुढील लढत दक्षिण कोरियाच्या किम युनशी होईल.

समीर वर्माची विजयी सलामी, श्रीकांत पराभूत

पुरुषांच्या एकेरीतील लढतीत समीर वर्माने विजयी सलामी देताना जपानच्या सकाई कझामासाला 21-13, 17-21, 21-18 असे हरवले. ही लढत 53 मिनिटे चालली. पुढील फेरीत समीरची लढत हाँगकाँगच्या लाँग अँगसशी होईल. दुसऱया एका सामन्यात किदांबी श्रीकांत पहिल्याच फेरीत पराभूत झाला. त्याला इंडोनेशियाच्या बिगरमानांकित शेसरने 21-16, 22-20 असे नमवत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.

पुरुषांच्या दुहेरीतील लढतीत अर्जुन-रामचंद्रन जोडीला चीनच्या गिटिंग-तॅन कियांग जोडीने 21-18, 21-15 असे नमवले. तर महिला दुहेरीत मेघना-पूर्वशा या भारतीय जोडीला थायलंडच्या प्रतिस्पर्धी जोडीने 21-13, 21-16 असे नमवण्याची किमया साधली.