|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » अमित धनकर, विकीला रौप्य

अमित धनकर, विकीला रौप्य 

आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप : महाराष्ट्राच्या राहुल आवारेला कांस्य, दीपक पुनिया, सुमीत मलिकाही कांस्यपदकाचे मानकरी

वृत्तसंस्था/ शियान (चीन)

येथे सुरु असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या अमित धनकर (74 किलो), विकी (92 किलो) गटात रौप्यपदक जिंकले. राहुल आवारेने 61 किलो गटात, 86 किलो गटात दीपक पुनिया तर 125 किलो गटात सुमीत मलिकला यांनी कांस्यपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत भारताला आतापर्यंत 1 सुवर्ण, 3 रौप्य व 4 कांस्यपदकासह एकूण आठ पदके मिळाली असून पदकतालिकेत भारत तिसऱया स्थानावर आहे.

सुशीलकुमारच्या अनुपस्थितीत 74 किलो गटात खेळणाऱया अमित धनकरने शानदार खेळाचे प्रदर्शन करताना अंतिम फेरी गाठली होती. मात्र, अंतिम फेरीत त्याला कझाकस्तानच्या देनियार कैसानोवकडून 5-0 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. याआधी, अमितने 2013 मध्ये या स्पर्धेत 66 किलो गटातून खेळताना सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय, अन्य 92 किलो गटात भारताच्या विकीने रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम लढतीत विकीला इराणच्या अलीरेजा मोहम्मदकडून 11-0 असा पराभव स्वीकारावा लागला. उपांत्य फेरीत चीनच्या प्रतिस्पर्धी मल्लाचा एकतर्फी पराभव करत विकीने अंतिम फेरी गाठली होती. मात्र, जेतेपदाच्या लढतीत त्याला अपेक्षित खेळ साकारता आला नाही.

महाराष्ट्राच्या राहुल आवारेला कांस्य

राष्ट्रकुल स्पर्धेत 57 किलो गटात सुवर्ण जिंकत महाराष्ट्राची शान उंचावणाऱया राहुल आवारेने आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्येही विजयी परंपरा कायम ठेवली. या स्पर्धेत 61 किलो गटात खेळताना राहुलने कांस्यपदकाची कमाई केली. या लढतीत त्याने कोरियाच्या किम जिनकोइलचा 9-2 असा पराभव केला. तसेच 86 किलो गटात दीपक पुनियाने तजाकिस्तानच्या कोदिरेवचा 8-2 असा तर 125 किलो गटात सुमित मलिकला तजाकिस्तानच्याच अनाकुलोवचा 8-2 असा पराभव करत कांस्यपदक पटकावले.  पहिल्या दिवशी 65 किलो गटात बजरंग पुनियाने सुवर्ण, 79 किलो गटात परवीन राणाने रौप्य तर 97 किलो गटात सत्यव्रत कादियानने कांस्यपदक जिंकले होते. आता, या स्पर्धेत भारताची पदकसंख्या आठवर पोहोचली आहे.