|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » झगडणाऱया केकेआरविरुद्ध आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान

झगडणाऱया केकेआरविरुद्ध आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान 

आयपीएल साखळी फेरी : यजमान कोलकाताची कर्णधार दिनेश कार्तिकवरच मुख्य भिस्त

कोलकाता / वृत्तसंस्था

आगामी आयसीसी विश्वचषक संघातील स्थान जवळपास निश्चित झालेल्या दिनेश कार्तिककडून कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलमध्ये आता मुख्य अपेक्षा असणार आहे. केकेआरचा संघ सध्या मागील सलग पाच सामन्यात पराभूत झाला असून आज (दि. 25) त्यांची लढत राजस्थान रॉयल्सविरुद्ध होत आहे. रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल.

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ केवळ आंद्रे रसेलवरच पूर्णपणे अवलंबून आहे, असे या मोसमात सातत्याने दिसून आले आहे. आगामी आयसीसी विश्वचषक स्पर्धेत युवा ऋषभ पंतऐवजी संघात स्थान लाभणारा दिनेश कार्तिक सध्या खराब फॉर्ममध्ये आहे, ही कोलकाताची मुख्य चिंता आहे. दिनेश कार्तिक मागील आयपीएल हंगामात केकेआरतर्फे सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांत आघाडीवर होता. पण, यंदा 9 सामन्यात त्याला 16.71 च्या किरकोळ सरासरीवर समाधान मानावे लागले आहे.

उर्वरित 4 सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय संपादन करणे आवश्यक असताना मुख्य प्रशिक्षक जॅक कॅलिसने केकेआरकडून 2014 मधील आवृत्तीप्रमाणे धमाकेदार मुसंडी मारण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. 5 वर्षांपूर्वी झालेल्या आयपीएल हंगामात केकेआरने सलग चक्क 9 विजय नोंदवत दुसरे आयपीएल जेतेपद संपादन केले होते. यंदा मात्र केकेआरला अलीकडे सातत्याने अपयशाचा सामना करावा लागला असून यामुळे त्यांच्या संघव्यवस्थापनाने दिनेश कार्तिक, कुलदीप यादवसारख्या काही खेळाडूंना चक्क विश्रांती देण्याचाही कटू निर्णय घेतला.

कोलकाताच्या विशेषतः फिरकी गोलंदाजांनी बरीच निराशा केली आहे. वास्तविक, यापूर्वी 2012 व 2014 मध्ये आयपीएल जेतेपद संपादन केले, त्यावेळी फिरकी गोलंदाजी हेच त्यांचे बलस्थान ठरले होते. यंदा मात्र या आघाडीवर ते सपशेल आपटले असून कुलदीप यादव, सुनील नरेन व पियुष चावला या तीन स्पेशालिस्ट फिरकीपटूंना 10 सामन्यात एकत्रित केवळ सोळाच बळी घेता आले आहेत. यापूर्वी पहिल्या टप्प्यातील लढतीत केकेआरने राजस्थानला नमवले होते. येथे मात्र ते सलग पराभवाने चांगलेच खचले असून पुन्हा विजयपथावर येणे त्यांच्या दृष्टीने प्रचंड आव्हानात्मक असेल.

राजस्थानही खराब फॉर्ममध्येच

एकीकडे, केकेआरचा संघ सलग पाच पराभवामुळे खचलेला असताना दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सची स्थितीही फारशी वेगळी नाही. आठ संघांच्या गुणतालिकेत ते तूर्तास सातव्या स्थानी फेकले गेले असून या खराब प्रदर्शनामुळे त्यांना मोसमाच्या मध्यातच कर्णधार बदलणेही भाग पडले आहे. या हंगामातील पहिल्या टप्प्यात अजिंक्य रहाणेकडे नेतृत्वाची धुरा होती. पण, मध्यातच त्याची उचलबांगडी केली गेली आणि स्टीव्ह स्मिथ नवा कर्णधार ठरला. नेतृत्व सोपवल्या गेल्यानंतर लागलीच पहिल्या लढतीत त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध संघाला दमदार विजय संपादन करुन दिला. कर्णधारपदाचे ओझे उतरलेल्या अजिंक्य रहाणेने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शतक झळकावले. पण, ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नव्हती. आता पुन्हा विजयपथावर येण्याचे त्यांचे लक्ष्य असेल.

प्रतिस्पर्धी संघ

कोलकाता नाईट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उत्थप्पा, ख्रिस लिन, शुभमन गिल, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रेथवेट, सुनील नरेन, पियुष चावला, कुलदीप यादव, निखिल नाईक, जो डेन्ली, श्रीकांत मुंढे, नितीश राणा, संदीप वॉरियर, प्रसिद्ध कृष्णा, लॉकी फर्ग्युसन, हॅरी गर्नी, मॅट केली, केसी करिअप्पा, यार्रा पृथ्वीराज.

राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), संजू सॅमसन, बेन स्टोक्स, शुभम रंजने, ऍस्टॉन टर्नर, स्टीव्ह स्मिथ, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, सुधेशन मिधुन, जयदेव उनादकट, ईश सोधी, प्रशांत चोप्रा, महिपाल लोमरोर, ओशेन थॉमस, आर्यमन बिर्ला, रियान पराग, धवल कुलकर्णी, जोफ्रा आर्चर, कृष्णप्पा गौतम, लियाम लिव्हिंगस्टोन, वरुण ऍरॉन, जोस बटलर, शशांक सिंग, मनन वोहरा, राहुल त्रिपाठी.

सामन्याची वेळ : रात्री 8 वा.