कानपूरस्थित पियूष जैन यांच्या घरातून 150 कोटींचे घबाड जप्त
कानपूर / वृत्तसंस्था
कानपूरमध्ये पियूष जैन नावाच्या अत्तर व्यापाऱयाच्या निवासस्थानावर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी धाड टाकली. या छापेमारीत 150 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता सापडली आहे. अनेक मशीनच्या मदतीने रात्रभर नोटांची मोजणी सुरू होती. शुक्रवारी दुपारपर्यंत कोणाचेही डोळे विस्फारणारे घबाड अधिकाऱयांच्या हाती सापडले आहे. जप्त करण्यात आलेल्या नोटा आणि अन्य दस्तावेज घेऊन जाण्यासाठी अधिकाऱयांना 50 मोठे खोके आणि कंटेनर मागवावा लागला. दरम्यान, या कारवाईनंतर पियूष जैन यांचा पुत्र प्रत्युष जैन याला सध्या अटक करण्यात आली असून त्याची अधिक चौकशी केली जात आहे.
व्यापारी पियुष जैन यांचा कन्नौजमध्ये अत्तरांचा व्यापार आहे. गुरुवारी सकाळी पीयूष जैन यांच्या निवासस्थानासह कारखाना, ऑफिस, कोल्ड स्टोरेज आणि पेट्रोल पंपावर एकाच वेळी छापा टाकण्यात आला. ही कारवाई कानपूरसह कनौज, गुजरात, मुंबई येथे एकाचवेळी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वेगवेगळय़ा ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला दस्तावेज एकत्र आणून पुन्हा त्याची मोजदाद केली जाणार आहे. आतापर्यंत 150 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्राप्तिकर विभागाने आतापर्यंत केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. जैन यांच्या घरातील कपाटात कोटय़वधींच्या नोटांचे बंडल्स सापडले आहेत. आयटी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत 4 मशीनमधून 40 कोटी रुपये मोजण्यात आले. उर्वरित नोटा शुक्रवारी दिवसभरात मोजण्यात आल्या. तब्बल 16 तास नोटांची मोजणी सुरू होती. घरात मोठय़ा प्रमाणात रोकड सापडल्यामुळे एसबीआयच्या कर्मचाऱयांना बोलावून नोटांची मोजदाद करावी लागली. कानपूरमध्ये पियूष जैन यांच्या नोटा मोजण्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. तसेच या छाप्याची छायाचित्रेही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.
अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय?
व्यापारी पियूष जैन हे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत त्यांनी एक महिन्यापूर्वी लखनौ येथे ‘समाजवादी’ नावाचे अत्तर लॉन्च केले होते. पियूष जैन यांच्या जवळपास 40 कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून करचोरी करण्यात आली आहे. अत्तर (परफ्यूम) निर्मिती कनौजमध्ये होत असून त्यांचे मुंबईत शोरूम्स आहेत. या परफ्यूमचा पुरवठा देश-विदेशात केला जातो.
‘शिखर पान मसाला’ छाप्यातून कनेक्शन
बुधवारी शिखर पान मसाला येथे जीएसटी आणि प्राप्तिकरचे छापे पडले होते. याचदरम्यान अधिकाऱयांना सुपारी व्यापारी के. के. अग्रवाल यांच्याकडून करचुकवेगिरीचे कनेक्शन सापडले. यानंतर आयटी पथकाने गुरुवारी पियूष जैन आणि केके अग्रवाल यांच्या ठिकाणांवर छापे टाकले. मात्र, अग्रवाल यांच्या घरातून किती मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.