हुबळी-मुंबई रेल्वे दोन दिवसांसाठी रद्द तर इतर रेल्वे मिरज-कुर्डुवाडीमार्गे धावणार
प्रतिनिधी / बेळगाव
दसरा-दिवाळी या सणांसाठी नैर्त्रुत्य रेल्वेने विशेष रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली होती. 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या दरम्यान या रेल्वे धावणार आहेत. परंतु या रेल्वे सुरू होण्याआधीच त्याला ग्रहण लागले आहे. मागील 7 महिन्यांपासून बंद असणारी हुबळी-मुंबई ही रेल्वे दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे.
पुणे विभागात मागील काही दिवसांपासून तुफान पाऊस झाला आहे. यामुळे रेल्वे मार्गाचे ठिकठिकाणी नुकसान झाले आहे. भिलवाडी आणि नांदे या परिसरात रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. काहींच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला असल्याचे नैर्त्रुत्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनल (क्र. 07317) ही रेल्वे 22 व 23 ऑक्टोबरदरम्यान रद्द करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनल-हुबळी (क्र. 07318) ही रेल्वे 23 ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. वास्को-हजरत निजामुद्दीन रेल्वेच्या मार्गात 20 ते 23 ऑक्टोबरदरम्यान बदल करण्यात आला असून ही रेल्वे मिरज, कुर्डुवाडी, दौंडमार्गे धावणार आहे. हजरत निजामुद्दीन -वास्को ही रेल्वे 19 ते 22 ऑक्टोबरदरम्यान दौंड, कुर्डुवाडी, मिरजमार्गे धावणार आहे.
यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन ही द्विसाप्ताहिक रेल्वे 21 रोजी व हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर या रेल्वेच्या मार्गात दि. 20 रोजी बदल करून ती दौंड, कुर्दुवाडी, मिरजमार्गे धावणार आहे. यशवंतपूर-निजामुद्दीन (संपर्क क्रांती एक्स्प्रेस) दि. 20 ते 22, निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेस दि. 21 रोजी दैंडमार्गे धावणार आहे. म्हैसूर-अजमेर या रेल्वेच्या मार्गातही दि. 20 रोजी बदल करण्यात आला असून ही रेल्वेही दौंडमार्गे धावणार आहे.
प्राणेश (जनसंपर्क अधिकारी, नैर्त्रुत्य रेल्वे)
पुणे विभागातील भिलवाडी व नांदे येथील रेल्वे ब्रिजची दुरुस्ती करण्यात येत आहे. यासाठी नैर्त्रुत्य रेल्वे विभागातील पुण्याच्या दिशेने जाणाऱया रेल्वेच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. 22 ऑक्टोबरपासून सुरू होणारी हुबळी-एलटीटी रेल्वे दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे शनिवार दि. 24 पासून ही रेल्वे नियमित धावणार असल्याची माहिती त्यांनी दिली.