प्रतिनिधी / पणजी
कोरोनाच्या बाबतीत गोवा ‘ग्रीन झोन’मध्ये आला आहे. मात्र गोव्याच्या शेजारील कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत आहे. ही राज्ये ऑरेंज झोनमध्ये आहेत. या राज्यांतून सध्या गोव्यामध्ये भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू येत आहेत. या वाहनासोबत कर्नाटक महाराष्ट्रातील चालक व साहाय्यक गोव्यात येत आहेत. त्यामुळे गोव्यासाठी ही अत्यंत धोकादायक बाब बनली आहे.
कोरोनामुक्त गोव्याला सध्या कोरोनाग्रस्त राज्यांचा विळखा आहे. गोव्यात 3 एप्रिलनंतर एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडलेला नाही. कर्नाटकातील जवळच्या जिल्हय़ांमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बेळगावमध्ये बरेच रुग्ण सापडले आहेत. तर उत्तर कर्नाटकमध्येही प्रकरणे सापडत आहेत. बेळगावमध्ये आतापर्यंत 87 रुग्ण सापडले आहेत. त्यातील 26 रुग्ण बरे झाले. मागील 15 दिवसांत बेळगावमध्ये 36 रुग्ण सापडले आहेत. गोव्याचे भाजी व फळांचे मार्केट बेळगाववर अवलंबून आहे. बेळगावमध्ये धारवाड व दावणगिरी येथूनही माल येतो. धारवाडमध्येही रुग्ण सापडले आहेत. दावणगिरी सुरुवातीला ग्रीन झोनमध्ये होता. मात्र लॉकडाऊन शिथिल करताच दावणगिरीत सुमारे 30 रुग्ण आढळून आले. मागील आठ दिवसांत तिथे 47 रुग्ण सापडले आहेत.
गोव्याने सतर्क राहण्याची गरज
कारवार, भटकळ भागातही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. गोव्यात या भागातूनही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होतो. वाहने मोठय़ा प्रमाणात गोव्यात येत आहेत. ड्रायव्हर, क्लीनर गोव्यात येतात. भटकळमध्ये दोन दिवसांपूवीं बारा प्रकरणे समोर आली आहेत. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हय़ातही रुग्ण सापडले आहेत. गोव्यात कोल्हापूर, रत्नागिरी येथूनही जीवनावश्यक वस्तू येतात. वाहने मोठय़ा प्रमाणात येतात. कोल्हापूरात प्रकरणे समोर आली आहेत. गोव्याच्या जवळ असलेल्या जिल्हय़ांची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. गोव्याची स्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र शेजारील राज्यांतील स्थिती पाहता गोव्याने सतर्क राहण्याची गरज आहे.
लॉकडाऊन शिथिलतेमुळे गर्दीत वाढ
गोव्यात लॉकडाऊन शिथिल केल्याने वाहनांची, लोकांची गर्दी वाढत आहे. मार्केट परिसरातही लोक मुक्तपणे फिरत आहेत. ही शिथिलता सध्या प्रसारमाध्यमे व लोकांमध्येही चर्चेचा विषय बनला आहे. पावसाळा जवळ आला. येथील लोकवस्त्याही दाट आहेत. त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचा सूर व्यक्त होत आहे.