दररोज 6 ते 7 विमानांच्या फेऱया : देशातील मुख्य शहरांना कनेक्टिव्हीटी : तिकीट दर कमी झाल्यामुळे प्रवाशांचा ओढा वाढला
प्रतिनिधी /बेळगाव
दिल्ली, मुंबई, बेंगळूर यासारख्या शहरांना बेळगावमधून जाण्यासाठी प्रवाशांना बससेवा, रेल्वेसह आता विमानसेवाही उपलब्ध आहे. उडान-3 मुळे अत्यंत माफक दरामध्ये विमानफेरीचा तिकिट दर ठेवण्यात आला आहे. खासगी एसी बसपेक्षा कमी तिकिट दर व कमी वेळेत प्रवास होत असल्यामुळे प्रवाशांची पसंती विमान प्रवासाला मिळू लागली आहे.
बेळगाव विमानतळाचा समावेश उडान-3 मध्ये झाल्यानंतर स्पाईसजेट, इंडिगो, स्टार एअर, अलायन्स एअर, ट्रुजेट या विमान कंपन्यांना देशातील विविध शहरांना मार्ग मंजूर झाले. तिकीट दर कमी झाल्यामुळे प्रवाशांचा ओढा वाढला. बेळगावसह कोल्हापूर, सांगली, हुबळी, कोकण या भागातून प्रवासी बेळगावला येत आहेत. सध्या देशातील महत्त्वाच्या 11 शहरांना विमानसेवा मिळत असल्यामुळे कमी वेळेत नागरिक प्रवास करीत आहेत.
जानेवारी 2020 पर्यंत बेळगावमधून उत्तमप्रकारे विमानसेवा सुरू होती. परंतु त्यानंतर कोरोनामुळे बरेच दिवस विमानसेवा बंद होती. पहिल्या लाटेनंतर हळूहळू विमानसेवा सुरू असतानाच दुसरी लाट आल्याने पुन्हा सेवा ठप्प झाली. त्यानंतर आता पुन्हा हळूहळू विमानसेवा पूर्वपदावर येत आहे. विमानाचा सुरक्षित प्रवास असल्यामुळे प्रवाशांची पहिली पसंती विमानाला मिळत आहे. आराम बसच्या एसी प्रवासापेक्षा कमी तिकीट दरामध्ये विमानसेवा बेळगाव विमानतळावरून प्रवाशांना मिळत आहे.
म्हैसूर, कडप्पा, नागपूरसाठी अजून प्रतीक्षा
म्हैसूर व कडप्पा या दोन शहरांना टुजेट कंपनी सेवा देत होती. परंतु तांत्रिक कारणाने नोव्हेंबर 2020 पासून विमानसेवा ठप्प आहे. तसेच कोरोनाच्या पहिल्या लाटेपूर्वी स्टार एअरने नागपूर शहराला विमानसेवा सुरू करणार असल्याचे घोषित केले होते. परंतु कोरोनामुळे ही सेवा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे म्हैसूर, कडप्पा, नागपूरसाठी नागरिकांना अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
सध्या सुरू असणाऱया शहरांची सेवा
बेंगळूर, मुंबई, पुणे, हैद्राबाद, दिल्ली, तिरुपती, अहमदाबाद, सुरत, जोधपूर, इंदूर, नाशिक, अजमेर (कनेक्टिंग)
सेवा देणाऱया विमान कंपन्या
स्पाईसजेट, इंडिगो, स्टार एअर, अलायन्स एअर.
शहराचे नाव | विमानाचा तिकीटदर (प्राथमिक) | खासगी एसी बसचा तिकीटदर | रेल्वेचा एसी तिकीटदर | |
बेळगाव- दिल्ली | 5890 | – | 2980 | |
बेळगाव- मुंबई | 2885 | 1500-2000 | 2230 | |
बेळगाव-बेंगळूर | 2915 | 1500-2000 | 2310 | |
बेळगाव-पुणे | 1680 | 1000-1500 | 985 | |
बेळगाव-तिरुपती | 2159 | 1500-2000 | 1050 | |
बेळगाव- हैद्राबाद | 2090 | 1500-1800 | – | |
बेळगाव-सुरत | 2542 | 2000 | 1650 | |
बेळगाव-जोधपूर | 4491 | 2600 | 4105 | |
बेळगाव-अहमदाबाद | 4091 | 2500-3000 | 3285 | |
बेळगाव-इंदूर | 4491 | – | – | |
बेळगाव- नाशिक | 2459 | 1800 | – | |