दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचे आश्वासन
कुडचडे/ पणजी
कुडचडे दयानंद कला केंद्राने दक्षिण गोव्यात चंदेरी महोत्सव यशस्वीपणे घडवून आणून आपली क्षमता सिद्ध केली आहे. हा महोत्सव आयोजन तसेच कार्यक्रमांच्याबाबतीसह सर्व दृष्टीने राष्ट्रीय स्तराचा असल्याने त्याला राष्ट्रीय महोत्सवाचा दर्जा मिळायला हवा, तो मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी चंदेरी महोत्सव गौरव सोहळय़ात दिले आहे.
चंदेरी महोत्सवातील छपाईचे काम करणारे बांदेकर ऑफसेटचे मालक सुदेश बांदेकर बंधुंचा सार्दिन यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच चंदेरी महोत्सवासाठी बाहेरुन येणाऱया निमंत्रित कलाकारांना निवासव्यवस्था व सभागृह सवलतीच्या दरात उपलब्ध करणाऱया श्री शांतादुर्गा चामुंडेश्वरी महामाया कुडतरकरीण घुडो-अवडे देवस्थान समितीचाही गौरव करण्यात आला. देवस्थानचे अध्यक्ष गोकुळदास नाईक यांच्या वतीने देवस्थानचे मुखत्यार रोहिदास होडरकर यांनी हा गौरव वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्या हस्ते स्वीकारला.
यावेळी मंत्री काब्राल म्हणाले की दयानंद कला केंद्राची सुवर्ण महोत्सवी वाटचालीस अशा अनेक व्यक्तींनी हातभार लावल्याने ही संस्था यशस्वीपणे मार्गक्रमाण करत आहे. अशा व्यक्तींचा गौरव करणे हे आयोजकांचे कर्तव्य असते, दयानंद कला केंद्राने पार पाडले याबद्दल अभिमान वाटतो.
केंद्राचे अध्यक्ष मोर्तू नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सचिव बंटी उडेलकर यांनी सूत्रसंचालन, गौरवमूर्तीचा परिचय व आभार प्रदर्शन केले.