कंपनीचे रोजगार निर्मितीचे ध्येय – ओडिसात गुंतवणूक
नवी दिल्ली
जिंदाल स्टील ऍण्ड पॉवर लिमिटेड (जेएसपीएल) आगामी दहा वर्षांच्या कालावधीत ओडिसामध्ये जवळपास एक लाख कोटीपेक्षा अधिकची गुंतवणूक करणार असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष नवीन जिंदाल यांनी दिली आहे. सदरच्या गुंतवणुकीमधून रोजगार निर्मिती करण्याचे ध्येय असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीदरम्यान धातू आणि धातूशी संबंधीत क्षेत्रात जवळपास 1,46,172 कोटी रुपयांच्या प्रमुख पाच औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी पोलाद प्रकल्पाची क्षमता सध्याच्या क्षमतेपेक्षा सहा दशलक्ष टन वार्षिकने वाढवून 25.2 दशलक्ष टन वार्षिक करण्यास मान्यता दिली आहे.
आगामी काळात गुंतवणूक
आगामी दहा वर्षांच्या कालावधीसाठी जिंदाल कंपनी एक लाख कोटींपेक्षा अधिकची रक्कम गुंतवणूक करण्यासह पोलाद प्रकल्पांचा विस्तार करणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.