प्रतिनिधी /बेळगाव
पतंग उडविणे हा जरी आनंदाचा क्षण असला तरी यामुळे हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकते. याची प्रचिती नुकतीच उज्ज्वलनगर येथे आली. पतंगाचा मांजा विद्युतवाहिन्यांमध्ये अडकल्यानंतर तो जोराने ओढला. यामुळे ट्रान्स्फॉर्मरखाली बसविण्यात आलेला बॉक्स जळून निकामी झाला. यामुळे क्षणभराचा आनंद हेस्कॉमला मात्र हजारो रुपयांचे नुकसान करून गेला. सध्या ऑनलाईन शिक्षण असल्याने दुपारनंतर विद्यार्थ्यांना बराच वेळ मिळत आहे. सध्या पाऊसही कमी असल्याने पतंग उडविण्याच्या स्पर्धा रंगू लागल्या आहेत.
पतंगासाठी चायनिज मांजाचा वापर केला जात आहे. सदर मांजा विद्युतवाहिन्यांमध्ये अडकला तरी तो तुटत नाही. मंगळवारी मांजा मुख्य वाहिन्यांमध्ये अडकल्यानंतर तो काढण्यासाठी ओढला. परंतु वीजवाहिन्यांमध्ये स्पार्क होऊन नजीकच्या ट्रान्स्फॉर्मरखालील बॉक्समधील सर्वच वाहिन्या जळाल्या. पण ट्रान्स्फॉर्मर सुरक्षित राहिला. त्यामुळे मांजा ओढताना विद्युतवाहिन्यांना धक्का पोहोचणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.