आज सकाळी 11 वाजता होणार शपथविधी
प्रतिनिधी /पणजी
गोव्याचे नवनियुक्त राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचा आज गुरुवारी सकाळी 11 वाजता राजभवनवर शपथविधी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती त्यांना शपथ देतील.
पिल्लई यांचे काल बुधवारी दुपारी गोव्यात आगमन झाले. दाबोळी विमानतळावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो, सभापती राजेश पाटणेकर, विरोधी पक्षनेते आमदार दिगंबर कामत व सौ. पिल्लई उपस्थित होत्या.
पिल्लई हे सध्या मिझोरामचे 15 वे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. दि. 6 जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्तीची घोषणा केली होती. पेशाने वकील असलेले श्रीधरन हे राजकारणात सक्रिय असले तरी सिद्धहस्त लेखकही आहेत. त्यांनी आतापर्यंत सुमारे 125 पुस्तके लिहिली आहेत. विद्यार्थी दशेतच त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कोझिकोडे जिल्हा अध्यक्ष, राज्य सचिव आणि सरचिटणीस यांसह भाजपमध्ये अनेक पदांवर काम केले आहे. 2003 ते 2006 या काळात ते केरळ भाजपा प्रदेशाध्यक्ष होते. 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सने केरळ आणि लक्षद्वीप या दोन जागा जिंकल्या. 2018 मध्ये त्यांची पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. 25 ऑक्टोबर 2019 रोजी त्यांची मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.
अल्प परिचय
केरळ राज्याच्या अलापुझा जिह्यातील व्हेनमोनी गावात 1953 मध्ये जन्मलेले श्रीधरन पिल्लई हे बहुआयामी, हुशार, दानशूर व्यक्तीमत्व. सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ राजकारणी, नामवंत साहित्यिक. त्यांच्या नावावर इंग्रजी, मल्याळम आदी भाषातून लिहिलेली कायदा, राजकारण, साहित्य, कविता अशा साहित्य प्रकारातील 125 पुस्तके आहेत. विविध टीव्ही चॅनलवरही ते सदैव सक्रिय असत.