दिवाळी हा आपला प्राचीन सण. यंदा दिवाळीवर कोरोनाचे सावट आले होते. दिवाळीच्या निमित्ताने थोडी जुन्या इतिहासाची उजळणी केली. ज्ये÷ इतिहासकार सतीशचंद्र यांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर लिहिलेल्या ग्रंथांमधून भारताच्या आगळय़ावेगळय़ा सांस्कृतिक वैशिष्टय़ावर प्रकाश टाकला आहे.
अनेक शतके भारत हा विविधतेत एकतेची प्रचिती देणारा देश आहे. इथे विविध सांस्कृतिक आणि सामाजिक प्रवाहांची सरमिसळ आहे. जवाहरलाल नेहरू यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, ‘भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, पण त्याच्या अंतरंगात समन्वयाची प्रेरणा आहे.’ ही समन्वयाची प्रेरणा भारतीय इतिहासाच्या मध्ययुगीन काळात अतिशय प्रबळ होती. सामान्य नागरिकांमध्ये, विशेषतः खेडय़ात, विचारांच्या आणि जगण्याच्या समन्वयाचे प्रवाह अधिक प्रबळ होते.
होळी, दसरा, दुर्गा पूजा, दिवाळी, राखी पौर्णिमा आणि ईद हे सण गरीब आणि श्रीमंत एकत्र साजरे करीत. काही वेळा एकत्र साजरे झाले नाही तरी शेजाऱयांना त्यात सामील करून घेतले जाई. ज्योतिष, हस्तसामुद्रिक आणि पंचांग या गोष्टी समान होत्या. समान नायक-नायिका आणि धार्मिक कथांमधील पात्रे, प्रतीके आणि दंतकथांमुळे समान वाङ्मयीन आणि मौखिक प्रथा रूढ झाल्या होत्या.
चित्रे, अभिजात संगीत आणि लोकसंगीत, गाणी आणि नृत्ये यातून माणसांची मने, सृजनशीलता आणि जगण्याचे अर्थ व्यक्त होतात, समान पद्धतीने विकसित होतात, संगीत, नृत्य, चित्रे आणि लोककलांची शैली अगदी समान होती आणि आहे.
राजेंद्रप्रसाद यांनी आत्मचरित्रात लिहिले आहे, ‘ग्रामीण जीवनात धर्म झिरपत होता आणि हिंदू-मुस्लिमांमध्ये परिपूर्ण एकोपा होता. हिंदूंच्या होळीत मुस्लिम उत्साहाने सामील होत. दसरा, दिवाळी आणि होळीच्या वेळी मुस्लिम लोक गाणी रचीत. मोहरममध्ये हिंदू ताबूत घेऊन सामील होत. झिरदेई आणि जामापूर येथील श्रीमंत हिंदूंचे ताबूत इतर गरीब मुस्लिमांच्या ताबुतांपेक्षा मोठे असत.’
‘लाल-बाल-पाल’ या त्रयीतील महान राजकीय नेत्याचा बिपिनचंद्र पाल-एक अवतरण उदृधृत करतो. आता बांगला देशात असलेल्या सिल्हेट या त्यांच्या खेडय़ात त्यांचे बालपण गेले. ते म्हणतात, ‘माझ्या वडिलांच्या घरात आम्ही मुस्लिम शेजारी, जमीनदार वगैरेंना आमच्या सर्व घरगुती कार्यक्रमात बोलवायचो. मुसलमानांचा सण ईद असो की लग्ने असोत, एकमेकात भेटवस्तूंची आवर्जून देवाणघेवाण होई.’’
एकत्र राहणे आणि परस्परांना समजून घेण्याची वृत्ती ही आपल्या जनतेची मोठी ताकद आहे. ती जपली पाहिजे.