सातारा / प्रतिनिधी
कोरोनासारखे खडतर आव्हान असूनदेखील जिल्ह्यातील शिक्षक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शिक्षणाचा प्रवाह विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवित आहेत. हे चित्र नक्कीच आशादायक ठरणारे असल्याचे मत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डाॅ. रामचंद्र कोरडे यांनी व्यक्त केले.
‘थॅक अ टीचर’ अभियानातंर्गत कोविड- 19 काळातील शिक्षण या विषयावरील आॅनलाइन शिक्षक परिसंवादाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रवींद्र खंदारे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)
धनंजय चोपडे तसेच जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षक सहभागी झाले होते.
“कोरोनाजन्य परिस्थितीमुळे सर्वच क्षेत्रात अस्थिरता, अनिश्चितता निर्माण झाली आहे. शिक्षणाचे क्षेत्रदेखील त्याला अपवाद नाही. मात्र तरीही जिल्ह्यातील शिक्षक या संकटाचे रूपांतर संधीत करुन विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात कायम ठेवत आहेत, हा प्रयत्न कोैतुकास्पद आहे, असे डाॅ. कोरडे यांनी नमूद केले.
राजेश क्षीरसागर यांनी ‘थँक अ टीचर’ या अभियानांतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ‘विद्यार्थी सातत्याने कृतिशील राहावा, अभ्यासक्रमाशी जोडलेला असावा यासाठी शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नाना यश लाभत आहे, असेही त्यांनी सांगितले.
रवींद्र खंदारे यांनी प्रास्तविक केले.
भरत मोझर, सुनील शेडगे यांनी सूत्रसंचालन केले. उपशिक्षणाधिकारी(माध्यमिक) श्रीकांत जगदाळे यांनी आभार मानले. त्यासाठी ग्यानप्रकाश फाउंडेशनचे प्रकाश भोसले यांचे सहकार्य लाभले. परिसंवादात बालाजी जाधव, सागर राऊत, विभा साबळे, प्रदीप कुंभार, महेश लोखंडे, संदीप किर्वे, शुभांगी पाटील, ज्योती कदम, लीना पोटे, हे शिक्षक सहभागी झाले होते. कोविड काळातील शिक्षण, त्यासाठी राबविण्यात आलेले तंत्रज्ञान, त्याचे फायदे, तोटे आदींबाबत या शिक्षकांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी राबविलेल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांची माहितीही त्यांनी स्लाईडच्या माध्यमातून दिली.