ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ईडी कडून चौकशीचा धडाका सुरू आहे. आतापर्यंत ईडीने सुशांतची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीची 8 तास आणि तिचा भाऊ शोविकची 18 तास चौकशी केली आहे. त्यानंतर आता ईडीने आज पुन्हा एकदा रिया आणि तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
ईडीने सुशांत सिंह राजपूतच्या बँक खात्यावरुन झालेल्या मोठ्या आर्थिक व्यवहार प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर 15 कोटी रुपयांचा बेनामी व्यवहार केल्याचा आरोप केला आहे. याचाच भाग म्हणून रिया आणि तिच्या कुटुंबियांची चौकशी सुरु आहे.
दरम्यान, आज रिया आणि तिच्या वडिलांसह तिचा भाऊ शोविकलाही बोलावले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ईडीने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांचे इतर व्यवहार देखील तपासण्यास सुरुवात केली आहे. रिया चक्रवर्ती आणि तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची चौकशी करणार आहे. या आत्महत्या प्रकरणात आर्थिक अपहार असल्याच्या संशायावरुन ही चौकशी सुरु आहे.