कोलॉन, जर्मनी : माजी जागतिक अग्रमानांकित ब्रिटनच्या अँडी मरेला येथे सुरू झालेल्या एटीपी इनडोअर टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. स्पेनच्या फर्नांडो व्हर्डास्कोने त्याला सरळ सेट्समध्ये हरविले.
दिवसातील पहिल्या सामन्यात व्हर्डास्कोने चौथ्या मॅचपॉईंटवर सामना संपवताना मरेवर 6-4, 6-4 असा विजय मिळविला. या वर्षात मरेने भाग घेतलेली ही चौथी स्पर्धा आहे. दुखापतीमुळे त्याला काही स्पर्धात भाग घेता आला नव्हता. त्यामुळे त्याचे मानांकनही 115 व्या स्थानापर्यंत घसरले आहे. पार्श्वभागावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन केल्यावर त्याला फॉर्म मिळविण्यासाठी आतापर्यंत झगडावेच लागले आहे. 62 व्या मानांकित व्हर्डास्कोकडून पराभूत होण्याची त्याची ही सलग तिसरी वेळ आहे.
2018 मधील मोसमात व्हर्डास्कोने दोनदा (शेनझेन ओपन आणि यूएस ओपन) त्याला हरविले होते. तरीही दोघांमध्ये आतापर्यंत झालेल्या एकंदर लढतीत मरेची कामगिरी 13-4 अशी सरस आहे. व्हर्डास्कोची पुढील लढत जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हशी होणार आहे.