लॉकडाऊन‘ हा शब्द जरी कोणी उच्चारला तरी तो ऐकावासा वाटत नाही इतका तो शब्द नकोसा वाटू लागलाय. पण लॉकडाऊन शब्दाशी मिळता जुळता, उच्चारताना थोडय़ा फार प्रमाणात समान असा, पण जरा हटके असा लक डाऊन हा शब्द कदाचित क्वचितच ऐकला असावा आणि हा उत्सुकता वाढवल्याशिवाय राहणार नाही. 2020 जर लॉकडाऊन असेल तर 2021 लक डाऊन असू शकतो. हे कोडं वाटतं असलं तरी हे कोडं नसून आगामी मराठी सिनेमाच्या नावाची झलक आहे, ज्यामध्ये झळकणार आहे महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी.
इष्णव मीडिया हाऊस प्रस्तुत आणि दर्शन फुलपगार निर्मित लक डाऊन या आगामी मराठी सिनेमाचा मुहूर्त जुन्नर येथे विशेष पाहुणे आणि सिनेमाची स्टारकास्ट यांच्या उपस्थितीत पार पडला. माजी आमदार शरद सोनावणे (शिवजन्म भूमी), सत्यशील शेरकर चेअरमन विघ्नहर सहकारी साखर कारखाना गणेश कवडे युवासेना अध्यक्ष नगर अध्यक्ष श्याम पांडय़े (जुन्नर नगर पालिका) आणि पी.आय. युवराज मोहिते आदी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. धमाकेदार, मजेदार कथा असलेल्या या सिनेमात अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नवीन जोडी एकत्र दिसणार असून हे देखील मुहूर्ताच्या वेळी उपस्थित होते. संतोष मांजरेकर हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.