फुलांचा वर्षाव करून चिमुकल्यांचे स्वागत, काही ठिकाणी मिठाईचे वाटप
प्रतिनिधी /बेळगाव
राज्यसरकारच्या आदेशानुसार सोमवारपासून अंगणवाडय़ा दीड वर्षांनी पुन्हा सुरू झाल्या. यामुळे पुन्हा एकदा चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकू येवू लागला. बेळगाव जिल्हय़ातील 7 हजारांहून अधिक अंगणवाडय़ा सोमवारपासून सुरू झाल्या. अंगणवाडीमध्ये येणाऱया लहानग्यांचे पुष्प देवून स्वागत करण्यात येत होते. पहिलाच दिवस असल्याने चिमुकल्यांची संख्या तुरळक दिसून आली.
राज्यातील कोरोनाचे संकट काहीसे दूर झाल्यानंतर हळूहळू शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली. त्यानंतर राज्यातील अंगणवाडय़ा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर करून अंगणवाडय़ा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार सोमवारी अंगणवाडय़ा सुरू करण्यात आल्या. मागील दोन दिवसांपासून साफसफाईचे काम सुरू होते. सोमवारी अंगणवाडी शिक्षिका व साहाय्यक यांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जावून अंगणवाडी सुरू झाल्याचे सांगितले. त्यानंतर हळूहळू विद्यार्थी व त्यांचे पालक अंगणवाडीकडे येवू लागले.
मुलांना अंगणवाडीत सोडण्यासाठी पालकांची धावपळ
दीड ते दोन वर्षांपासून बंद असलेल्या अंगणवाडय़ा सोमवारपासून सुरू झाल्या. अंगणवाडीमध्ये दाखल होणाऱया चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी फुलांचा वर्षाव तसेच फुले भेट देण्यात आली. तर काही ठिकाणी मिठाईचे वाटप करण्यात आले. चिमुकल्यांना सोडण्यासाठी त्यांचे पालकही सोमवारी अंगणवाडय़ांमध्ये हजर होते. अनेक महिने लहान मुले घरीच असल्यामुळे त्यांना अंगणवाडीमध्ये जाणे काहिसे वेगळे वाटत होते. पालक मुलांना घेवून अंगणवाडीत येवून गेल्यानंतर त्यांची रडारड सुरू होत होती. पालकांपासून दूर जातोय यामुळे चिमुकले रडत होते. यामुळे त्यांच्यासोबत त्यांच्या पालकांना पहिला दिवस अंगणवाडीमध्ये घालवावा लागला. यामुळे पालकांचीही चांगलीच धावपळ उडाल्याचे दिसून आले.