प्रतिनिधी / कोल्हापूर
महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱया 15 अंध (दृष्टीहीन) विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. निमित्त होते जागतिक अपंग दिनाचे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब) कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे प्रत्येकी 10 हजार रुपयांचे चेक अंध विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना घाटे यांनी शिक्षण घेणाऱया अंध विद्यार्थ्यांचे कौतुक करून समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱया विविध उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ.मुरलीधर डोंगरे यांनी तर ओळख व सूत्रसंचालन डॉ.मीना डोंगरे यांनी केले. सचिव विजय रेळेकर यांनी आभार मानले. यावेळी बाळ पाटणकर, शिवानंद पिसे, ज्योती सावंत आदींसह अंध बंधूभगिनी उपस्थित होते.
अशी आहेत शिष्यवृत्ती प्राप्त 15 विद्यार्थ्यांची नावे
शिष्यवृत्ती प्राप्त 15 विद्यार्थ्यांमध्ये महादेव बन्नीगीडदावर, प्रविण हजारे, विनायक मगदूम, ओंकार तानाजी गुरव, किशोर पाटील, रोहन लाखे, रॉजर कुतीनो, धीरज लोकरे, सिध्दराज पाटील, माधव नाईक, ओंकार बाबुराव गुरव, सूरज पोवार, आदित्य पाटील, रघुनाथ खोत, सुनिल सुतार आदींचा समावेश आहे.
गरजू व आर्थिक दूर्बल 5 अंध विद्यार्थ्यांना मदत
लॉकडाऊन काळातील गरजू व आर्थिक दुर्बल अशा जिल्हयातील पाच अंध विद्यार्थ्यांना मदत म्हणून प्रत्येकी 2 हजार रुपयांचा चेक प्रदान करण्यात आला. यामध्ये उदय गुरव, विजया गुरव, बळीराम बुरूड, विजय कुबल, निता पाटील आदींचा समावेश आहे.