81 देशांच्या यादीत ब्रिटन पहिल्या स्थानी, पराग्वे तळाला, अमेरिका 43 व्या तर भारत 59 व्या क्रमांकावर
जगात केवळ जीवनाची गुणवत्ता नव्हे तर मृत्यूची गुणवत्ताही महत्त्वाची आहे. चांगले जीवन जगल्यावर आमचा श्वास देखील समाधानाने थांबावा असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु अधिक उत्पन्न गटाच्या देशांमध्ये राहत असलेल्या लोकांसाठी हे सत्य असते, तर अल्प उत्पन्नगटाच्या देशातील लोकांसाठी हे केवळ एक स्वप्न ठरते. असे का घडते याचे उत्तर वैज्ञानिकांनी अलिकडेच क्वालिटी ऑफ डेथ अँड डायिंग इंडेक्स 2021 द्वारे दिले आहे.
हे अध्ययन अमेरिकेच्या डय़ूक युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केले आहे. यात जगभरातील 81 देशांना जीवनाच्या अखेरीस दिल्या जाणाऱया देखभालीच्या आधारावर ए, बी, सी, डी, ई, एफ ग्रेड देण्यात आले आहेत. केवळ 6 देशांनी ए ग्रेड मिळविला तर 21 देशांना एफ ग्रेड मिळाला.
यादीत आघाडीवर असलेले देश
या निर्देशांकात ब्रिटन पहिल्या स्थानावर आहे. याचबरोबर आयर्लंड, तैवान, कोस्टा रिका, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाला देखील ए ग्रेड मिळाला आहे. या देशांमध्ये राहत असलेल्या लोकांना त्यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये चांगली शारीरिक आणि मानसिक देखभाल प्राप्त होते.
सर्वात खराब कामगिरी
81 व्या स्थानावर पराग्वे आहे. बांगलादेश, लेबनॉन, हैती, ब्राझील, सेनेगल, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका, आर्मेनिया, अर्जेंटिना, नेपाळ, सूदान, मलेशिया, इथियोपिया आणि इराक यासारख्या देशांनाही एफ ग्रेड प्राप्त झाला.
भारताला डी ग्रेड
या निर्देशांकात डी ग्रेडसह भारत 59 व्या स्थानी आहे. भारतासह चीन, रशिया, ग्रीस, इंडोनेशिया, चिली, जॉर्जिया, व्हिएतनाम आणि मेक्सिकोलाही डी ग्रेड मिळाला. अमेरिकेला सी ग्रेडसह 43 वे स्थान मिळाले. कोलंबिया, म्यानमार, थायलंड, इजिप्त, घाना, इस्रायल, युगांडा, डेन्मार्क आणि नायजेरिया यासारखे देश देखील सी ग्रेडमध्ये सामील आहेत.
अधिक उत्पन्नगटाचे देश
चांगल्या ग्रेड्समध्ये अधिक उत्पन्नगटाचे देश सामील आहेत. तेथील सरकार उर्वरित देशांच्या तुलनेत नागरिकांच्या आरोग्यावर अधिक खर्च करतात. तर उर्वरित देशांना नागरिकांच्या आरोग्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अशा देशांमध्ये विकसित देशांच्या तुलनेत एक तृतीयांशपेक्षा कमी आरोग्य सुविधा असल्याचे उद्गार संशोधक स्टीफन कॉनर यांनी काढले आहेत.