ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
चीनचे अनियंत्रित 21 टन वजनी रॉकेट अखेर हिंदी महासागरात कोसळल्याने जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
अंतराळात स्पेस स्टेशन बांधण्यासाठी चीनने साहित्य लाँगमार्च 5बी हे रॉकेट 29 एप्रिलला लाँच केले होते. हे रॉकेट अंतराळात स्पेस स्टेशन बांधण्यासाठी साहित्य घेऊन जात होते. दरम्यान, या रॉकेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते आनियंत्रित झाले. हे रॉकेट पृथ्वीच्या पृष्ठभागावर कोसळण्याची भीती होती. त्यामुळे चीनने हे रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर हे रॉकेट नष्ट केले. त्यानंतर या रॉकेटचे तुकडे हिंदी महासागरात जाऊन कोसळले.
अमेरिकन स्पेस फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, हे रॉकेट 18 हजार मैल प्रति तास या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत होते. बीजिंगमधील स्थानिक वेळ सकाळी 10.24 वाजण्याच्या सुमारास ते पृथ्वीच्या कक्षेत आले होते. हिंदी महासागरात या रॉकेटचे अवशेष कोसळले असल्याचे वृत्त चिनी माध्यमांनी चीनच्या अंतराळ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. या रॉकेटचे अवशेष भारत-श्रीलंकेच्या दक्षिण-पश्चिम भागात हिंदी महासागरात कोसळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.