मालवण शहरात होणार अग्निशमन दल केंद्र
प्रतिनिधी / मालवण:
मालवण पालिकेला मंजूर असलेला अग्निशमन दल केंद्राचा निधी वेळेत खर्च न झाल्याने मागे गेला होता. या निधी खर्चावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली होती. मात्र सदरचा निधी पुन्हा आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मालवण नगर परिषदेला प्राप्त झाला आहे. सदरच्या अग्निशमनदल केंद्रासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला आहे. अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण या योजनेंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये मालवण नगर परिषद अग्निशमनदल केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.
जिल्हा वार्षिक योजना 2019-20 करिता सिंधुदुर्ग जिल्हय़ासाठी 225 कोटी निधीस मंजुरी आहे. अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण या योजनेंतर्गत मंजूर व अर्थसंकल्पित 2 कोटी 50 लाखाची तरतूद करण्यात आली असून या निधीतून मालवण नगर परिषदेत अग्निशमन दल केंद्र होण्यासाठी आमदार वैभव नाईक व नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. तसेच पाठपुरावा केला होता. त्यानुसार मालवण नगर परिषद अग्निशमन दल केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारतीचे बांधकाम करणे, या कामी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पूर्ण अंदाजपत्रकीय रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी दिली.
आम्ही येण्यापूर्वी निधी नगर परिषदेला आला होता. पण तो अखर्चित राहिल्याने मागे गेला होता. आमच्या कालावधीत पुन्हा पाठपुरावा केला आणि निधीही पुन्हा उपलब्ध झाला आहे. या बाबत निविदा पण प्रसिद्ध करण्यात आली आहे, असेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.