लोकांकडून मागतो एक फळ
तुम्ही भाकरी, दूध किंवा पैसे मागण्याचा प्रकार पाहिला असाल. परंतु एका व्यक्तीला अजब छंद आहे, तो जगभरातील लोकांकडून सफरचंद मागतो. तसेच याकरता तो वृत्तपत्रांमध्ये जाहिरातीही देतो. लोकांना ईमेल पाठवून तो सफरचंदाची मागणी करतो. अमेरिकेतील एका केमिकल इंजिनियरची ही कहाणी अत्यंत रंजक अन् दंग करणारी आहे.
नॉर्थ कॅरोलिनात राहणारे 79 वर्षीय टॉम ब्राउन एक निवृत्त केमिकल इंजिनियर आहेत. 1990 च्या दशकापासून ते दुर्लभ प्रजातीच्या सफरचंदांचा शोध घेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सुमारे 1200 प्रजातींचा शोध घेतला आहे तसेच स्वतःच्या दोन एकर बागेत त्यांच्या रोपांची लागवड केली आहे. स्वतःच्या बागेला ते हेरिटेज ऍपल गार्डन म्हणतात. येथे त्यांनी 700 प्रकारच्या सफरचंदांना प्रदर्शित केले आहे. यात ब्लॅक वाइनसेप, कँडी स्ट्राइफ, रॉयल लेमन, रबुन बालड, येलो बेलफ्लॉवर, जुनालुस्का आणि नाइट ड्रॉपर यासारख्या अपरिचित सफरचंदांचा समावेश आहे.
जगभरातील वैज्ञानिक देतात भेट
त्यांच्याकडील सफरचंदांच्या झाडांची पाहणी करण्यासाठी जगभरातून वैज्ञानिक पोहोचतात. अनेक पर्यटकही त्यांच्या बागेत येत असतात. टॉम ब्राउन यांनी प्रत्येक प्रकारच्या सफरचंदाबद्दल विस्तृत माहिती नमूद केलेली आहे. सफरचंद आकारात वेगवेगळी असतात, त्यातील काही 5 इंचापर्यंतची असतात तर काही पिंग पोंग बॉलच्या आकाराची असतात. एका प्रकारचे सफरचंद काळय़ा रंगाचे आणि लांब तसेच टोकदार असते. यातील अनेक सफरचंदांना लोकांची नावे मिळाली आहेत. बग हॉर्न या नावाचे सफरचंद मला सर्वात वेगळे वाटले. अधिक माहिती मिळविली असता एका शेतकऱयाचे नाव या प्रजातीला देण्यात आल्याचे कळले असे टॉम यांनी सांगितले आहे.
अशी सूचली कल्पना
माझ्या घरी सफरचंदाची 5 झाडं होती. या सफरचंदाच्या प्रजातीची माहिती आईला विचारली असता तिला याबाबतीत काहीच माहित नव्हते. मग पत्नीसोबत एका जाणकाराकडून यासंबंधी जाणून घेतले, अशा स्थितीत सर्व प्रकारच्या सफरचंदांच्या झाडाची लागवड करण्याचा निर्णय घेतल्याचे टॉम ब्राउन म्हणाले.
घरोघरी जात मागतात सफरचंद
प्रारंभी मला कुणीच गांभीर्याने घेत नव्हते. दोन महिन्यांपर्यंत घरोघरी जात सफरचंदाच्या जुन्या झाडांविषयी विचारणा करायचो. अनेकदा वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या. सुरुवातीला लोक माझ्या कामाची थट्टा करायचे, परंतु नंतर लोकांनीच संपर्क साधण्यास सुरुवात केली. एका डोंगरावर सफरचंदाची काही झाडं आहेत असे कळल्यावर तेथे गेलो होतो असे ते सांगतात. टॉम ब्राउन यांना या कामासाठी जगभरातील पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. सफरचंदांना वाचविणे माझी प्राथमिकता आहे, किमान एका पिढीने माझे काम पुढे न्यावे अशी माझी इच्छा असल्याचे टॉम म्हणाले.