उचगांव / वार्ताहर
भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने ॲक्टिवा दुचाकीला ठोकरल्याने उषा विवेक राणे ( वय 33, रा ब्लॉक नंबर 32 म्हाडा कॉलनी, उजळाईवाडी, ता करवीर ) ही महिला जागीच ठार झाली. हा अपघात पुणे-बेंगलोर महामार्गावर उचगाव हद्दीत शिवनेरी हॉटेलनजीक गुरुवारी रात्री उशिरा झाला.
उषा राणे रात्री तावडे हॉटेलकडून एक्टिवाने (एम एच 09- इएच 5417) उचगावकडे जात होत्या. शिवनेरी हॉटेल नजीक महामार्गावर त्या आल्या असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या ॲक्टिवाला ठोकरले. त्यामुळे त्या खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच त्या ठार झाल्या. मृत महिलेचा कणेरीवाडी येथे वडापावचा स्टॉल असून त्यांची मुले लहान असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. याबाबतची फिर्याद भारत मारुती बागडे ( रा. उचगाव) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. याबाबत गुन्हा नोंद झाला असून पोलीस हवालदार विजय मुंदाळे तपास करत आहेत.