आरोग्य खात्याच्या मुख्य सचिवांकडून पत्रक जारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेळगावमधील सुवर्ण विधानसौध येथे 13 डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा मार्गसूचींचे पालन करण्यासंबंधी आरोग्य खात्याच्या मुख्य सचिवांनी पत्रक जारी केले आहे. त्यानुसार अधिवेशनात सहभागी होणाऱया प्रत्येकाला कोरोना लसीचे दोन डोस घेणे आणि 72 तास अगोदर केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे.
अधिवेशनात सहभागी होणाऱया सर्व आमदार, मंत्री, अधिकारी, कर्मचारी, प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असणे सक्तीचे आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाने 72 तासांच्या अगोदर केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या मुख्य सचिवांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सचिवांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे विधानसभा सचिवालयाने आमदारांना कोविड मार्गसूचीचे सक्तीने पालन करण्याची विनंती केली आहे.
अधिवेशन काळात दोन्ही सभागृहांमध्ये दररोज सॅनिटायझिंग करावे, सॅनिटायझरचा वापर, थर्मल स्क्रिनिंग करणे, मधूमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड विकार, यकृत, हृदयासंबंधी समस्या असणाऱयांनी फेसशिल्ड बरोबरच मास्कचा वापर करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
ताप, सर्दी, घसादुखी, खोकला, श्वसनावेळी त्रास आदी समस्या असणाऱयांना अधिवेशनात सहभागी होण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रत्येकाला मास्क वापर सक्तीचा आहे. तसेच सुवर्णसौधमध्ये आवश्यक वैद्यकीय कर्मचारी आणि वैद्यकीय सेवेची सज्जता ठेवावी, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.