चंदगड तालुक्यातील महिलेची मण्णीकेरी येथे आत्महत्या
प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राम पंचायत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने एका महिलेने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी मण्णीकेरी, ता. बेळगाव येथे उघडकीस आली आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
यल्लुताई मारुती गावडे (वय 32) रा. सोनारवाडी, ता. चंदगड असे या महिलेचे नाव आहे. यल्लुताईचे माहेर मण्णीकेरी येथील असून सोनारवाडी येथे सासर आहे. ग्राम पंचायत सदस्यपदी निवडणुकीत त्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीतही यल्लुताई उमेदवार होत्या.
या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्यांची मानसिक स्थिती खालावली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्या मण्णीकेरी येथील आपल्या माहेरी आल्या होत्या. शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण जेवण करून झोपले होते. त्यावेळी गावाजवळील विहिरीत यल्लुताई यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
मध्यरात्री यल्लुताई दिसून आल्या नाहीत म्हणून कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. गावाजवळील विहिरीवर त्यांच्या चपला दिसल्याने संशयाने विहिरीत डोकावले असता त्यांच्या साडीचा पदर दिसून आला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.