निवडणूक आयोगाचा प्रचारकांच्या यादीतून हटविण्याचा निर्देश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रक्षोभक विधाने करणारे भाजप नेते अनुराग ठाकूर आणि प्रवेश सिंग वर्मा यांच्यावर निवडणूक आयोगाने बुधवारी कठोर कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही नेत्यांना प्रचारकांच्या यादीतून त्वरित हटविण्याचा निर्देश भाजपला दिला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांच्या विधानांवर जोरदार टीका करण्यात आली होती. शाहीन बाग संबंधी आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी मॉडेल टाउनमधील भाजपचे उमेदवार कपिल मिश्रा यांच्यावरही आयोगाने दोन दिवसांची प्रचारबंदी घातली आहे.
भाजप नेत्यांच्या वाचाळपणावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. आयोगाने भाजपला बजावलेल्या नोटीसमध्ये ठाकूर आणि वर्मा यांच्या प्रचारावर बंदी घालण्याचा आदेश नमूद आहे.
हिमाचल प्रदेशच्या हमीरपूरचे खासदार आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीत प्रचार करताना ‘देश के गद्दारों को, गोली मारो…’ असे विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. तर पश्चिम दिल्लीचे खासदार प्रवेश वर्मा यांनी शाहीन बाग निदर्शनाची तुलना काश्मीरशी करत ‘निदर्शक आता घरात घुसतील आणि माताभगिनींवर बलात्कार करतील’ असे म्हटले होते.
केजरीवालांना संबोधिले नक्षली
विधानावर विरोध झाल्यावरही खासदार वर्मा यांनी माफी मागणार नसल्याची भूमिका मांडली आहे. तसेच वर्मा यांनी बुधवारी वृत्तवाहिनीवर बोलताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नक्षलवादी तसेच दहशतवादी संबोधिले आहे.