शारजाचे मैदान मुळातच छोटे आहे. या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना प्रवेश दिला जात नाही. पण, स्टेडियम छोटे असल्याने बाहेर काही प्रेक्षक जरुर असतात. काही जण मोठय़ा स्क्रीनवर सामने पाहण्यासाठीही येतात. अर्थात, हे मैदानच छोटे असल्याने फलंदाजांचे काही उत्तूंग षटकार थेट स्टेडियमबाहेर भिरकावले जातात. धोनीने राजस्थानविरुद्ध असाच एक उत्तूंग षटकार खेचल्यानंतर चेंडू थेट स्टेडियमबाहेर गेला आणि बाहेर स्क्रीनवर सामना पाहणाऱया एका प्रेक्षकाने चेंडू हाती घेत थेट घरचा रस्ता धरणे पसंत केले!
चेंडू हातात मिळाल्यानंतर खुश झालेल्या त्या प्रेक्षकाने बाहेरचा रस्ता धरला, तो क्षण कॅमेऱयाने टिपला आणि ट्वीटरवर पाहता पाहता हा अवलिया व्हायरल होत गेला. या लढतीत धोनी 14 व्या षटकात फलंदाजीला उतरला, त्यावेळी चेन्नईची 5 बाद 114 अशी स्थिती होती आणि त्यांना विजयासाठी आणखी 103 धावांची गरज होती.