प्रतिनिधी/ खेड
स्कोडा कार घेण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या रकमेचा बोजा उतरवण्यासाठी बँकेतून घेतलेल्या पत्रात खाडाखोड करून शहरातील अपना सहकारी बँकेची 22 लाख 50 हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 जुलै 2018 ते 8 मार्च 2021 या कालावधीत घडल्याचे बँकेचे व्यवस्थापक सुधीर गोविंद सागवेकर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
किरण प्रकाश बोरकर (32), वीरसिंग प्रकाश बोरकर (40, दोघेही रा. बोरघर-चिंचवली), विशाल रामचंद्र हिंगणे (42, मिरज-सांगली) अशी फसवणुकीचा आरोप असलेल्या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण व वीरसिंग यांनी एमएच 08/एएन 2223 क्रमांकाची स्कोडा कार घेण्यासाठी अपना सहकारी बँकेकडून 22 लाख 50 हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. त्यानुसार घेतलेल्या कर्जाचा बोजा उतरवण्यासाठी बँकेचे कर्मचारी प्रसाद म्हाडेश्वर यांनी आवश्यक ते पत्र लिहून दाखला तयार केल्यानंतर त्यावर व्यवस्थापक सागवेकर यांनी सही केली.
हा दाखला स्वीकारल्यानंतर दोघांनी 11 जुलै 2018 रोजीच्या कर्जाचा बोजा उतरवण्याच्या पत्रावर व 35 नंबरच्या अर्जावर स्कोडा कारचा नंबर एमएच 08/एएन 2223 यावरील ए.एन. या अक्षरातील ‘एन’ या अक्षरावर खाडाखोड करून त्यावर ओव्हर यू गाईड करून ‘क्यू’ असे बेकायदेशीरपणे पत्रात बदल करून घेतला. बँकेच्या वाहन कर्जप्रकरणी खाडाखोड करून त्यावर ओव्हर राईट करत बँकेची 22 लाख 50 हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नजीब इनामदार करत आहेत. ।।।।