थिवीतील प्लायवूड विक्रेते नविन पटेल यांचे अपहरण : अपहरणात गुंतला होता त्यांचाच माजी कामगार : अपहरणकर्ते पाचहीजण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे : दोघांनी जेलमध्ये शिजविला होता अपहरणाचा कट
प्रतिनिधी / पणजी
थिवी येथून व्यवसायिकाचे अपहरण करून एक कोटी रुपयांची मागणी करणाऱया टोळीला गोवा पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत गजाआड केले आणि त्याचबरोबर त्या व्यवसायिकाची सुखरुप सुटका करण्यातही यश मिळविले आहे. पकडण्यात आलेल्या संशयितांच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंद केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिणा यांनी दिली आहे. याबाबत नविन पटेल यांचे नातेवाईक सुनिल पटेल यांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या कामाची स्तुती करून पोलीस बक्षिसास पात्र असल्याचेही मिणा यांनी संगितले.
येथील पोलीस मुख्यालयात काल गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिणा बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत पोलीस उपमहानिरीक्षक परमादित्य व उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना उपस्थित हेते.
पोलीस महासंचालक म्हणाले की अटक केलेल्या संशयितांमध्ये बिरेंद्र कुमार (26 वर्षे, मूळ बिहार, सध्या सांताक्रूझ येथे वास्तव्य), निशांत मोघन (22 मूळ कर्नाटक, सध्या सांताक्रूझ येथे वास्तव्य), मंजूनाथ बायगानूर (28 कांदोळी) सुजित केसकर (25) व सुभाष भोसले (51) दोघेही मूळ कोल्हापूर महाराष्ट्र येथील असून सध्या सांताक्रूझ येथे राहत होते.
प्लायवूड खरेदीच्या निमित्ताने अपहरण
नविन पटेल यांचे थिवी-बार्देश येथे प्लायवूडचे दुकान आहे. अपहरणकर्ते दुपारी 12 च्या सुमारास प्लायवूड घ्यायचे निमित्त करून पटेल यांच्या दुकानात आले. पटेल प्लायवूड दाखविण्यासाठी आत गेले असता दुकानाचे शॅटर अपहरणकर्त्यांनी बंद केले आणि चाकू व पिस्तुल दाखविले. त्यांच्या डोळ्य़ांवर पट्टी बांधली. गाडीत बसवून त्यांना आगशी-तिसवाडी येथील एका विनावापर पडून असलेल्या इमारतीत नेऊन ठेवले.
कामगाराचे सिमकार्ड घेतले हिसकावून
आगशी येथे जात असताना संशयितांनी वाटेत चालत जाणाऱया एका कामगाराला पकडले. त्याचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. त्याच्या मोबाईलमधील सिमकार्ड काढले व त्याचा मोबाईल परत त्याला दिला. त्या कार्डाचा वापर करून पटेल यांच्या नातेवाईकांना फोन केला.
एक कोटी रुपयांची केली मागणी
पटेल यांच्या नातेवाईकांकडे एक कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास किवा पोलिसांना कळविल्यास नविन पटेल यांना जीवे मारण्याची धमकी दिली. भर दिवसा व्यवसायिकाचे त्याच्या दुकानातून अपहरण करणे, ही राज्यातील पहिलीच घटना आहे. राज्यात गुन्हेगारी कुठल्या स्तराला पोचली आहे, ते दिसून येत आहे. फिल्मी स्टाईलने झालेल्या या अपहरणाच्या घटनेमुळे संपूर्ण गोवा हादरून गेला आहे.
कामगाराने दिलेली माहिती ठरली महत्वाची
नविन पटेल यांच्या नातेवाईकांनी त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार बुधवारी संध्याकाळी कोलवाळ पोलीस स्थानकात दाखल केली होती. गोवा पोलिसांनी अनेक पथके तयार करून तपासकामाला सुरुवात केली. ज्या फोन नंबरवरून पटेल यांच्या नातेवाईकांना फोन आला होता तो फोन नंबर पोलिसांनी तपासला. सदर नंबर ज्या कामगाराचा होता त्या कामगाराला शोधून काढले. संशयितांनी कशाप्रकारे त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यातील सिमकार्ड कसे हिसकावले होते हे, त्या कामगाराने पोलिसांना सांगितले. मोबाईल हिसकावून घेणाऱयांची सविस्तर माहितीही दिली, जी पोलिसांना खूप सहाय्यक ठरली.
कामगाराची तक्रार नोंद न केल्याने हवालदार निलंबीत
ज्या कामगाराकडून अपहरणकर्त्यांनी मोबाईल हिसकावून घेऊन सिमकार्ड घेतले होते, त्या कामगाराने ओल्ड गोवा पोलीस स्थानकात घटनेची माहिती देऊन तक्रार नोंद करण्यास सांगितले होते. मात्र यावेळी डय़ुटीवर असलेले हवालदार संतोष यादव यांनी त्यांची तक्रार नोंद करून घेतली नव्हती. अपहरणाचे प्रकरण उघडकीस आले आणि त्यात या कामगाराच्या सिमकार्डचा वापर करण्यात आल्याचे उघड होताच हवालदार संतोष यादव याला निलंबीत करण्यात आले.
बिरेंद्र कुमारला पहिल्यांदा केले गजाआड
बिरेंद्र कुमार याला ओल्ड गोवा पोलिसांनी यापुर्वी चोरी प्रकरणात अटक केली होती. कामगाराने दिलेली माहिती बिरेंद्र कुमारशी मिळतीजुळती असल्याने पोलिसांनी बिरेंद्र कुमार याला अटक केली. त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने इतर संशयितांची माहिती दिली असता इतरांनाही अटक करण्यात आली.
अपहरणाचा कट शिजला तुरुंगात
संशयित निशांत मोघन काही महिन्याप्ंाtर्वी नविन पटेल यांच्या दुकानात काम करीत होता. नंतर त्याने काम सोडले होते. पटेल यांच्या दुकानात होणाऱया आर्थिक उलाढालीबाबत निशांत मोघन याला चांगली माहिती होती. त्यामुळे अपहरणकर्त्यांनी तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. एका चोरी प्रकरणात अटक केल्यानंतर बिरेंद्र कुमार तुरुंगात होता. त्याच काळात निशांत मोघनही एका गुन्हेगारी प्रकरणात तुरुंगात पोहोचल होता. दोघांची तुरुंगात ओळख झाली. दोघे तुरुंगात असतानाच त्यांनी हा अपहरणाचा कट रचला होता. इतर तिघे संशयित हे बांबोळी गोमेकॉच्या पॅन्टिनमध्ये (सोडेक्स कंपनी) काम करीत होते. गुन्हेगारी प्रवृत्तीचा असलेला बिरेंद्र कुमार हा या प्रकरणातील मुख्य संशयित आहे. निशांत मोघनच्या मदतीने त्याने हा सारा कट रचला व इतर तिघा संशयितांना मदतीला घेऊन नविन पटेल यांचे अपहरण केले.
कोणताही गुन्हेगारी प्रकार घडला तर संबंधीत पोलीस स्थानकात त्वरित तक्रार दाखल करा असे पोलीस महासंचालकांनी लोकांना आवाहन केले आहे. पोलीस लगेच तक्रार नोंद करून घेतील. तक्रार नोंद करून न घेणाऱया पोलीस कर्मचाऱयावर कारवाई करून त्याला निलंबीत केले जाणार असल्याचेही पोलीस महासंचालकांनी सांगितले.
पोलिसांना जनतेकडूनही सहकार्य मिळणे गरजेचे
राज्यात गुन्हेगारी प्रकरणे वाढत असली तरी पोलिसही चांगले काम करीत असून तक्ररींचा अवघ्याकाही वेळातच तपास लावला जात असल्याचे पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिणा म्हणाले. पोलिसांना जनतेकडूनही सहकार्य मिळणे गरजेचे आहे. एखाद्या परप्रांतीय व्यक्तीला कामाला ठेवत असताना त्याची सविस्तर माहिती स्थानिक पोलीस स्थानकात देणे अवश्यक असते, मात्र अनेकजण या नियमाचे पालन करीत नसल्याचे दिसून येते. लोकांनी त्याचे पालन करावे, असे आवाहन पोलीस महानिरीक्षकांनी केले आहे.
गोव्यातील तीव्रतेने वाढणारी गुन्हेगारी चिंताजनक राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी प्रकार वाढले असून त्यांची तीव्रताही वाढली आहे. दिवसाढवळ्या भर रस्त्यात जाळून मारणे, भर दिवसा गोळय़ा झाडून ठार मारणे, सामूहिक बलात्कार या सारखे भयंकर गुन्हेगारी प्रकार घडत आहेत. एकंदरीत गोवा कुठल्या दिशेने जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुन्हेगार अशा प्रकारचे गुन्हे करण्याचे धाडस करतात तरी कसे? पोलीस यंत्रणेचा या गुन्हेगारांना धाक नाही काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. शांतीप्रिय म्हणाऱया गोव्यातही आता गंभीर स्वरूपाची गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढू लागली आहे, असे दिसून येत आहे.