प्रतिनिधी/ खंडाळा
पारगांव- खंडाळा बसस्थानका जवळ असणाऱया हॉटेलमधून अपहरण केलेल्या युवकाची अवघ्या सहा तासात सुटका करित चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात खंडाळा पोलीसांना यश आले.
याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि.8 रोजी विटा (सांगली) येथील व्यापारी व त्यांचा मुलगा हे कामानिमित्त पुणे येथे आले होते. पुण्यातील काम संपवून व्यापारी विटा (सांगली) येथे परत जात असताना अनोळखी व्यक्तीने व्यापाऱयाच्या मुलाच्या मोबाईल फोनवर फोन करुन व्यवसायानिमित्ताने बोलायचे आहे सांगून त्यांना पारगाव- खंडाळा बसस्थानकाजवळील पुजा बिअर बारमध्ये बोलावून घेतले. त्याप्रमाणे व्यापारी व मुलगा हे पुजा बारमध्ये आले असताना आकाश टेंगळे व अनोळखी 3 इसमांनी त्यांना उसने घेतलेले पैसे आताच्या आता परत करा, नाहीतर मुलगा अनिकेत मिलीद पिके (वय 31) याला बारामतीला उचलून घेवून जाणार असे म्हणत पांढऱया रंगाच्या महिंद्रा 500 एक्स.यु.व्ही. गाडीमध्ये घालून पळवून नेले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी तपासाबाबत पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सूचना केल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून अनोळखी आरोपी व अपहृत व्यक्तीच्या मोबाईल नंबरचे लोकेशन व गुह्यातील गाडीच्या माहितीवरुन आरोपीची माहिती घेवून खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे, पोलीस नाईक प्रशांत धुमाळ, तुषार कुंभार यांचे पथक तयार करण्यात आले.
दरम्यान, माळेगाव, बारामती येथे शोध घेवून चार आरोपींना ताब्यात घेवून अवघ्या सहा अपहृत व्यक्तीची सुटका करण्यात आली. या गुह्यातील संशयित आरोपी आकाश रघुनाथ टेंगळे (वय 28 वर्षे रा. मसोबाचीवाडी पणदरे- बारामती, जि. पुणे), अल्ताफ अब्बास इनामदार (वय 40 वर्षे रा. म्हसोबाचीवाडी पो. पणदरे रा. बारामती जि. पुणे), राहुल भारत सोनावणे (वय 33 वर्षे रा. माळेगाव बुदुक सावतामाळीनगर ता. बारामती जि. पुणे), कुलदिप चंद्रकांत जावळे (वय 24 वर्षे रा. सरकारी जनावरांच्या दवाखान्याजवळ, माळेगाव बुदुक, ता. जि. पुणे) यांना अटक करण्यात आली. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शशिकांत क्षीरसागर हे करीत आहेत.
खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक शंकर पांगारे, शशिकांत क्षीरसागर, पोलीस नाईक प्रशांत धुमाळ, तुषार कुंभार, सचिन वीर यांच्या पथकाने हि कारवाई केली.