अफगाणी पॉपस्टारचा आरोप ः भारत खरा मित्र
अफगाणिस्तानात तालिबानच्या कब्जाप्रकरणी पाकिस्तानची भूमिका आता समोर येऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तालिबानच्या कब्जावर आनंद व्यक्त केला होता. तर आता अफगाणिस्तानची प्रसिद्ध पॉपस्टार अर्याना सईदने पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. तालिबानच्या वाढत्या हिंसाचारासाठी तिने पाकिस्तानला जबाबदार धरले आहे.
तालिबानला पाकिस्तान बळ पुरवत असल्याचे आम्ही अनेक वर्षांपासून पाहत आलो आहोत. अफगाण सरकारकडून एखाद्या तालिबान्याला पकडण्यात आल्यावर चौकशीत तो पाकिस्तानी निघायचा. अफगाणिस्तानच्या संकटासाठी केवळ पाकिस्तान जबाबदार आहे. पाकिस्तानात तालिबानच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण मिळत असल्याचे अर्याना म्हणाली.
पाकिस्तानवर दबाव टाकावा
आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला देण्यात येणारी मदत तत्काळ रोखावी. याच पैशांमधून पाकिस्तान तालिबानला मदत करतो. दहशतवाद्यांना होणारी मदत रोखण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकला जावा असे तिने म्हटले आहे.
भारतात चांगली वागणूक
भारताने नेहमीच अफगाणिस्तानच्या भल्याचा विचार केला आहे. तो खऱया अर्थाने मित्र आहे. अफगाणिस्तानमधून आलेल्या शरणार्थींना भारतात चांगली वागणूक मिळते असे ती म्हणाली.
तालिबानला दिले होते आव्हान
अर्याना सईद अफगाणिस्तानातील सेलेब्रिटी आहे. 2015 मध्ये तिने स्वतःच्या कामाद्वारे तालिबानला आव्हान दिले होते. अफगाणिस्तानातील स्टेडियममध्ये जात तिने एक गाणे देखील म्हटले होते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तिने त्यावेळी हिजाब देखील परिधान केला नव्हता. त्यापूर्वी अफगाणिस्तानात असे कधीच घडले नव्हते.
अमेरिकेने काढले बाहेर
काबूलमध्ये तालिबानचा कब्जा झाल्यावर अर्याना अमेरिकेच्या विमानातून कतारमधील दोहा येथे पोहोचली होती. तेथून तुर्कस्तानच्या इस्तंबूल येथे जाण्याचा तिचा प्रयत्न आहे.