काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतातील एका मशिदीत शुक्रवारी मोठा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात स्थानिक मौलवीसह किमान 15 जण जखमी झाले आहेत. मशिदीतील स्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी गटाने स्वीकारलेली नाही. शुक्रवारी नमाज पठणासाठी मुस्लीम बांधव सहभागी झालेले असतानाच दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मशिदीच्या आतील भागात हा स्फोट झाला. तालिबानच्या एका अधिकाऱयाने या स्फोटाला दुजोरा दिला.
अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार आल्यापासून अस्थिरतेचे वातावरण आहे. मशिदींवरील हल्ले वाढले आहेत. यापूर्वी अनेक शिया मशिदींवर हल्ले झाले आहेत. इस्लामिक स्टेटने ऑक्टोबरच्या सुरुवातीला अफगाणिस्तानच्या कुंदुझ शहरातील मशिदीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यात 80 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जखमी झाले आहेत. स्फोट झाला तेव्हा या भागात राहणारे शिया मुस्लीम मोठय़ा संख्येने मशिदीत नमाज अदा करण्यासाठी आले होते.