स्थिती बदलत असल्याची टिप्पणी – तालिबानकडून हिंसाचार
वृत्तसंस्था/ काबूल
अमेरिका स्वतःच्या सैनिकांना अफगाणिस्तानातून परत बोलाविण्याची प्रक्रिया मंद करू शकतो. यामागे तालिबानकडून होणारा हिंसाचार हे कारण असल्याची माहिती पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी दिली आहे. अध्यक्षांनी सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य परत बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता आगामी काळात निर्माण होणाऱया स्थितीनुरुप निर्णय घेतला जाईल असेही किर्बी यांनी सांगितले आहे.
अफगाणिस्तानात स्थिती सातत्याने बदलत आहे. तालिबानकडून हल्ले केले जात आहत. आगामी काळात कुठल्याही प्रकारच्या बदलाची गरज भासल्यास आम्ही या प्रक्रियेत लवचिकता कायम ठेवू इच्छितो असे किर्बी यांनी म्हटले आहे.
आम्ही सातत्याने नजर ठेवून आहोत. अफगाणिस्तानातील स्थिती काय आहे? आम्ही काय करण्यास सक्षम आहोत आणि अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यास कुठल्या प्रकारच्या साधनांची गरज आहे याचा कानोसा घेतला जात आहे. अशाप्रकारचे सर्व निर्णय काळासोबत घेतले जात असल्याचे किर्बी म्हणाले.
निम्मे सैनिक परतले
तालिबान आणि अल-कायदाशी लढाई लढणे आणि अफगाणिस्तानच्या सैन्याला मदत केल्यावर एप्रिलमध्ये अध्यक्ष जो बायडेन यांच्या आदेशाची बऱयापैकी पूर्तता झाली आहे. अध्यक्ष बायडेन यांच्या निर्णयावेळी अफगाणिस्तानात 2,500 सैनिक आणि 1,600 हून अधिक कंत्राटी सुरक्षा जवान होते. यातील बहुतांश अमेरिकन नागरिक होते. पेंटागॉनने यापूर्वीच अनके प्रमुख तळांना अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांकडे सोपविले आहे. तसेच शेकडोंच्या संख्येतील कार्गो विमाने हटविली आहेत.