केंद्रीय औद्योगिक सुरक्षा पथकाची कारवाई
प्रतिनिधी / बेंगळूर
बेंगळूरच्या देवनहळ्ळी येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा पथकाच्या (सीआयएसएफ) अधिकाऱयांनी तडकाफडकी छापा टाकून बेकायदेशीरपणे वाहतूक करण्यात येणारे 75 लाख रुपये, महागडे मोबाईल, सोन्याची दागिने जप्त केली आहेत.
चेन्नईतील अबकारी अधिकारी मोहम्मद इरफान आणि त्यांच्या पत्नीची तपासणी करत असताना ते अवैधपणे वाहतूक करण्यात येत असलेले 74 लाख 81 हजार रुपये, सोन्याची दागिने आणि महागडे मोबाईल आढळून आले. ते बेंगळूरमार्गे उत्तर प्रदेशमधील लखनऊला जात होते, अशी माहिती सुत्रांकडून समजते.
प्रकरण प्राप्तिकर विभागाकडे वर्ग बेंगळूरच्या केंपेगौडा विमानतळावर मंगळवारी तपासणी सुरू असताना चेन्नईतील अबकारी अधिकाऱयाच्या पत्नीने विमानतळाच्या वॉश रुममध्ये बॅग फेकून दिली. त्यामुळे संशय आल्याने तेथील कर्मचाऱयांनी याविषयी पोलिसांना माहिती दिली. नंतर तेथे दाखल झालेल्या सीआयएसएफ अधिकाऱयांनी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये
10 लाख रुपये आढळून आले. त्यानंतर या दाम्पत्याची तपासणी केल्यानंतर कोणतीही कागदपत्रे नसताना चेन्नईहून बेंगळूरमार्गे लखनऊला नेण्यासाठी आणलेले 65 लाख रुपये तसेच आयफोन, महागडे मोबाईल्स जप्त करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण प्राप्तिकर विभागाकडे वर्ग करण्यात आले. अबकारी अधिकारी आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. त्यांनी ही रक्कम कोठून आणली?, ती लखनऊला नेण्याचे कारण काय?, याचा तपास केला जात आहे.