निळू फुले गेल्या शतकातले गाजलेले कलाकार. त्यांनी बहुविध भूमिका केल्या त्यांच्या खलनायकी भूमिका प्रेक्षकांच्या मनात जास्त ठसलेल्या होत्या. त्याबाबतचा एक किस्सा जसा आठवतोय तसा सांगतो. कुठल्याशा गावात परिचितांनी जेवणाचा आग्रह केला. इतरांबरोबर ते जेवायला बसले. घरातल्या कोणा आजीने त्यांना पाहिले आणि खवळली. या दुष्ट माणसाला आपल्या घरी जेवायला का बोलावलं म्हणून करवादली. पुढे काय झाले ते महत्त्वाचे नाही. अर्थात त्या भाबडय़ा आजीचा राग निळू फुले यांच्यावर नसून त्यांनी पडद्यावर साकार केलेल्या दुष्ट खलनायकावर होता. तिने त्यांच्या अभिनयाला नकळत दिलेली ती पावती होती.
असाच प्रकार प्राण यांचा. खाजगी आयुष्यात सज्जन गृहस्थ असलेल्या प्राण यांनी अनेक दशके हिंदी सिनेमात खलनायकी भूमिका साकारल्या. त्यांनी इतर भूमिका देखील ताकदीने केल्या असल्या तरी लोकांच्या मनात त्यांचा कपटी खलनायक पक्का रुजलेला होता. असं म्हणतात की काही दशके हिंदी पट्टय़ात कोणाही पालकाने आपल्या मुलाचं नाव प्राण ठेवलं नाही. असं यश कोणत्याही खलनायकाला मिळालं नाही. अगदी अमजद खानचा गब्बरसिंग किंवा अमरीश पुरींचा मोगँबो यांना देखील नाही.
खलनायक साकारणाऱया कलाकारांचं हे खलनायकायण आज आठवण्याचं कारण मजेदार आहे. गेले काही महिने एक मराठी कौटुंबिक मालिका गाजते आहे. आधी तिने एका धाडसी सामाजिक विषयाला हात घालून आणि संयमित कथाभाग दाखवून प्रेक्षकांना आकृष्ट करून घेतलं. नंतर दुर्दैवाने ती भरकटत गेली. तरी लोक ती बघत राहिले. रोजचा एपिसोड पाहिला की त्यातल्या गमतीबद्दल रोज सोशल मीडियावर लिहिणं ही फॅशन बनली. या मालिकेवर नियमित लिहिणाऱया थट्टामस्करी करणाऱया-लोकांचा फेसबुकवर समूह तयार झाला. आसावरी, बबडय़ा आणि अभिजीत ही लोकांच्या थट्टेची गिऱहाइकं बनली.
एक ज्ये÷ कलाकार या थट्टेने दुखावले. त्यांनी फेसबुकवर प्रतिक्रिया दिली. त्यावर पुन्हा लोकांनी ट्रोलिंग केलं. आज निळू फुले किंवा प्राण असते तर त्यांना जे सांगितलं असतं ते सांगायचा प्रयत्न करतो.
आम्ही चिडतो आणि थट्टा करतो ती तुम्ही रंगवलेल्या पात्रांची. तुमची नाही. निळूभाऊंवर करवादणाऱया आजींप्रमाणे आम्ही भाबडे प्रेक्षक व्यक्त होत असतो. ते स्वतःवर ओढून घेऊ नका.