बेळगाव : दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या सदाशिवनगर येथील संपिगे रोड येथील निवासस्थानी रविवारी दुपारी केंदीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी सुरेश अंगडी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी गृहमंत्र्यांसमवेत मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, उद्योगमंत्री जगदीश शेट्टर, कर्नाटकाचे प्रभारी अरुण सिंग, आमदार अनिल बेनके आदी उपस्थित होते. सुरेश अंगडी यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या निधनामुळे मोठी हानी झाली आहे. राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. ते नेहमी हसतमुख राहायचे, अशा शब्दात त्यांनी अंगडींच्या आठवणींना उजाळा दिला. सुरेश अंगडींच्या पत्नी मंगल अंगडी, कन्या स्फूर्ती व श्रद्धा, जावई डॉ. राहुल पाटील व संकल्प शेट्टर, त्यांचे बंधू मोहन अंगडी यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आजारपणामुळे मातोश्री सोमव्वा चन्नबसाप्पा अंगडी या बेळगावला येऊ शकल्या नाहीत. त्या नागेरहाळ येथील घरी आहेत. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर व्यापक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.