नौदलाला मिळणार सर्वोत्तम बळ – युद्धनौका अन् पाणबुडय़ांना तोंड देण्यास सर्वात प्रभावी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय नौदल आता अधिक सामर्थ्यशाली होणार आहे. अमेरिकेकडून जगातील सर्वोत्तम ‘एमएच-60आर’ सीहॉक हेलिकॉप्टर चालू वर्षात नौदलाला प्राप्त होणार आहेत. 24 पैकी 2 हेलिकॉप्टर्स भारताला जुलै महिन्यात तर चालू वर्षाच्या अखेरीस एक मिळणार आहे. हे हेलिकॉप्टर युद्धनौका आणि पाणबुडय़ांना शोधून त्यांना नष्ट करण्याची क्षमता बाळगून आहे.
नौदलाचे सुमारे 15 अधिकारी सध्या हेलिकॉप्टर हाताळण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. हे प्रशिक्षण सोमवारपासून अमेरिकेच्या फ्लोरिडामधील पेंसाकोला शहरात सुरू झाले आहे.
रोमियो सीहॉक हेलिकॉप्टर्सची निर्मिती लॉकहीड-मार्टिन कंपनीने केली आहे. भारत सरकारने मागील वर्षीच हेलिकॉप्टर खरेदीकरिता अमेरिकेसोबत करार केला होता. 24 हेलिकॉप्टर्स खरेदीचा हा व्यवहार सुमारे 17,500 कोटी रुपयांचा आहे. करारानुसार अमेरिका सर्व हेलिकॉप्टर्स 2024 पर्यंत भारताला देणार आहे.
सरकार नौदलासाठी मागील 15 वर्षांमध्ये पहिल्यांदाच हेलिकॉप्टर खरेदी करत आहे. भारतीय नौदलातील ब्रिटिश सी किंग हेलिकॉप्टरची जागा हे हेलिकॉप्टर घेणार आहे. सी किंग 2 दशकांपूर्वीच सेवेतून निवृत्त झाले होते.
नवे बळ मिळणार
1960 नंतरच्या कालावधीत नौदलासाठी अनेक प्रकारचे विशेष क्षमता असलेले हेलिकॉप्टर्स अत्यंत आवश्यक ठरले आहेत. 1980 च्या अखेरीस सी किंग 42 आणि कामोव्ह यासारख्या हेलिकॉप्टर्सना ताफ्यात सामील करण्यात आले होते. आता एमएच-60आर प्राप्त झाल्यावर नवे बळ मिळणार आहे.
अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी युक्त
सीहॉक हेलिकॉप्टर एजीएम-114 हेलफायर क्षेपणास्त्र, एमके 54 टॉरपीडो आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या शस्त्रास्त्रांनी युक्त आहे. या दुहेरी इंजिन असलेल्या हेलिकॉप्टरला युद्धनौका, प्रुजर्स आणि विमानवाहू युद्धनौकेवरूनही संचालित केले जाऊ शकते. रोमियो या नावाने प्रसिद्ध एमएच-60आर सीहॉक हेलिकॉप्टर पाणबुडीविरोधी असण्यासह टेहळणी, लक्ष्याचा शोध, बचाव, गनफायर आणि लॉजिस्टिक सपोर्टमध्ये उपयुक्त आहे.
पाणबुडय़ांना नष्ट करण्याची क्षमता
शत्रूच्या पाणबुडय़ांना नष्ट करण्यासह युद्धनौकांना हुसकावून लावणे आणि समुद्रात शोधमोहिमेकरिता हे हेलिकॉप्टर अत्यंत प्रभावी ठरणार आहे. या हेलिकॉप्टर्सच्या मदतीने देशांतर्गत स्तरावर भारताच्या सुरक्षेला बळकटी मिळणार आहे आणि क्षेत्रीय शत्रूंना तेंड देण्यास मदत होणार आहे. हे हेलिकॉप्टर अमेरिकेच्या नौदलात पाणबुडीविरोधी आणि अँटी-सरफेस वेपनच्या स्वरुपात तैनात आहे.