आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यातच 3 लाख कोटींचे नुकसान
अमेरिकेची अर्थसंकल्पीय तूट या अर्थसंकल्पाच्या पहिल्या 11 महिन्यांमध्ये विक्रमी 3 लाख कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचल्याची माहिती तेथील अर्थ मंत्रालयाने दिली आहे. कोरोना महामारीमुळे आलेल्या आर्थिक मंदीला तोंड देण्यासाठी सरकारकडून खर्च वाढविण्यात आल्याने देशाची अर्थसंकल्पीय तूट विक्रमी स्तरावर पोहोचली आहे.
ऑक्टोबर ते ऑगस्टपर्यंत अर्थसंकल्पीय तूट 11 महिन्यांच्या मागील विक्रमी आकडय़ाच्या तुलनेत दुपटीपेक्षाही अधिक आहे. 11 महिन्यांची मागील विक्रमी अर्थसंकल्पीय तूट 2009 मध्ये 1.37 लाख कोटी डॉलर्सची नोंदविली गेली होती. त्यावेळी प्रशासनाने 2008 च्या जागतिक आर्थिक संकटामुळे उद्भवलेल्या आर्थिक मंदीतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी वारेमाप खर्च केला हेता.
तूट आणखीन वाढणार
अमेरिकेत 2020 अर्थसंकल्पीय वर्ष समाप्त होण्यास अद्याप एक महिना शिल्लक आहे. 30 सप्टेंबर रोजी अर्थसंकल्पीय वर्ष समाप्त होईपर्यंत देशाची अर्थसंकल्पीय तूट आणखीन वाढू शकते. चालू अर्थसंकल्पीय वर्षात देशाची तूट 3.3 लाख कोटी डॉलर्स राहू शकते असा अनुमान काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मागील वर्षी कमी होते प्रमाण
मागील वर्षी अमेरिकेची अर्थसंकल्पीय तूट केवळ 984 अब्ज डॉलर्स होती. पूण्& एक व्यावसायिक वर्षात अर्थसंकल्पीय तुटीचा मागील विक्रम 2009 सालचा आहे. तेव्हा अमेरिकेत 1.4 लाख कोटी डॉलर्सची अर्थसंकल्पीय तूट निर्माण झाली होती. कोरोना महामारीशी लढण्यासाठी अमेरिकेच्या काँग्रेसने आतापर्यंत सुमारे 3 लाख कोटी डॉलर्सच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे.
कर्जाचे प्रमाण वाढणार
चालू वर्षाच्या अखेरपर्यंत सरकारचे कर्ज अमेरिकेच्या जीडीपीच्या 98 टक्क्यांएवढे होईल आणि पुढील वर्षी हे कर्ज देशाच्या जीडीपीपेक्षाही अधिक होणार असल्याचा काँग्रेसच्या बजेट ऑफिसचा अनुमान आहे. 1940 च्या दशकापासून आतापर्यंत असे घडलेले नाही. दुसऱया महायुद्धादरम्यान अमेरिकेचे कर्ज जीडीपीपेक्षाही अधिक झाले होते.
करउत्पन्न 1.3 टक्क्यांनी कमी
चालू आर्थिक वर्षात ऑगस्टपर्यंत अमेरिकेचे करउत्पन्न 3.05 लाख कोटी डॉलर्स राहिले आहे. मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत हा आकडा 1.3 टक्क्यांनी कमी आहे. तर अमेरिकेच्या सरकारचा खर्च या कालावधीत 6.05 लाख कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा 4.16 लाख कोटी डॉलर्स होता.
व्याजप्रमाणात घट
2019 च्या अखेरीस सरकारचे कर्ज जीडीपीच्या 79 टक्क्यांइतके होते. महामंदीपूर्वी 2007 मध्ये हे जीडीपीच्या 35 टक्क्यांइतके होते. अमेरिकेचे शासकीय कर्ज वाढले असले तरीही त्यावर दिले जाणारे व्याज मागील वर्षाच्या तुलनेत 10 टक्क्यांनी कमी होत 484 अब्ज डॉलर्सवर आहेत. मंदीमुळे व्याजदर घटल्याने व्याजदेयक कमी झाल्याचे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
लक्षणेरहित मुलांपासूनही फैलावतो विषाणू
सौम्य किंवा लक्षणेरहित मुलेही कोरोना विषाणू फैलावत असल्याचा दावा अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी केला आहे. संशोधकांनी अमेरिकेच्या उटा प्रांतात अध्ययन केले आहे. तेथील रुग्णालयांच्या बालदेखभाल केंद्रातील 12 मुलांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांच्या संपर्कात आल्याने केंद्राबाहेरील 12 जण बाधित झाले, यात त्यांचे कुटुंबीय देखील होते.
इतिहासातील सर्वात मोठे आव्हान
संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत कोरोना महामारीवर एक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेनंतर कोरोना महामारी इतिहासातील सर्वात मोठे आव्हान ठरली असल्याचे या प्रस्तावात म्हटले गेले आहे. महामारीचा आरोग्य, शिक्षण, गरीबी आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर या महामारीच्या पडलेल्या प्रभावावरही या प्रस्तावात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
रशियाची महत्त्वाची घोषणा
2020-21 मध्ये 100 कोटीहून अधिक लोकांना रशियाची स्पुतनिक-5 ही लस दिली जाणार असल्याचे रशियाच्या सॉवरेन वेल्थ फंडने म्हटले आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने लस निर्यात करण्यासाठी दोन व्यवहार केले आहेत. याचबरोबर ब्राझीलच्या बाहिया प्रांतासोबत लसीच्या तिसऱया टप्प्यातील क्लीनिकल ट्रायलवरही सहमती झाल्याचे इंटरफॅक्स वृत्तसंस्थेकडून सांगण्यात आले आहे.
इंग्लंड : रुग्णवाढ वेगात
एका अहवालानुसार इंग्लंडमध्ये दर 7 ते 8 दिवसांनी बाधितांचा आकडा दुप्पट होत आहे. एका अनुमानानुसार 24 जुलै आणि 11 ऑगस्टदरम्यान दर 10 हजार लोकांमागे 4 बाधित सापडले होते. तर 22 ऑगस्ट आणि 7 सप्टेंबरदरम्यान 10 हजार लोकांमागे 13 बाधित आढळले आहेत. इम्पीरियल कॉलेज, लंडनने 1 लाख 50 हजार लोकांवर अध्ययन करून ही माहिती दिली आहे.
कोरोना विषाणू मानवनिर्मितच!
कोरोना विषाणूवरून जगभरात अनेक महिन्यांपासून चीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. चीनच कोरोना संसर्गासाठी जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. महामारीसंबंधी चीनच्या भूमिकेवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेहमीच आक्षेप घेतला आहे. चीनने विषाणूची माहिती दडवून ठेवल्यानेच तो जगभरात फैलावल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. परंतु आता चीनच्या विषाणूतज्ञ डॉ. ली-मेंग यान यांनीच याचा पुनरुच्चार केला आहे.
कोरोना विषाणू मानवनिर्मित आहे. हा विषाणू चीनकडून निर्माण करण्यात आलेला आहे. माझ्याकडे याचे पुरावे असून ते मी सिद्ध करून दाखविणार असल्याचे ली यांनी म्हटले आहे.
ली यांचे पलायन
चिनी प्रशासनाच्या धमकीनंतर ली या 28 एप्रिल रोजी कॅथी पॅसिफिकमधून अमेरिकेसाठी रवाना झाल्या होत्या. तेव्हापासून त्या अमेरिकेत राहत आहेत. चिनी प्रशासनाच्या तावडीत सापडल्यास स्थिती दयनीय झाली असती हे त्या जाणून होतया. ली या रोगप्रतिकारकशक्तीच्याही विशेषज्ञ आहेत.
मांसबाजारातून उगम नाही
लवकरच कोरोना विषाणू मानवनिर्मित असल्याचे पुरावे सादर करणार आहे. कोरोना विषाणूसंबंधी चीनने जगापासून माहिती लपविल्याचा आरोप ली यांनी केला आहे. कोरोना वुहानच्या मांसबाजारातून आलेला नाही. हा धोकादायक विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतून आला असून तो मानवनिर्मित असल्याचे त्या म्हणाल्या.
हत्येची धमकी
मला खोटं ठरविण्यासाठी चिनी प्रशासन अनेक क्लृप्त्या लढवत आहे. चीन प्रशासनाने माझी हत्या करण्याचीही धमकी दिली आहे. तरीही मी माझ्या लक्ष्यापासून मागे हटणार नाही. कोरोना विषाणूचा जीनोम अनुक्रम एक मानव फिंगर प्रिंटप्रमाणे आहे. याच्याच आधारावर हा मानवनिर्मित विषाणू असल्याचे सिद्ध करून दाखविणार असल्याचे ली यांनी म्हटले आहे.