सर्व वर्ग ऑनलाईन असणाऱया विद्यार्थ्यांना मायदेशी परतावे लागणार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत शिकत असलेल्या विदेशी विद्यार्थ्यांना ट्रम्प प्रशासनाच्या एका निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे. सर्व वर्ग ऑनलाईन झालेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परतावे लागणार असल्याचे अमेरिकेच्या प्रशासनाने म्हटले आहे. या निर्णयाचा फटका एकूण 10 लाख विद्यार्थ्यांना बसणार आहे. यात 2 लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी सामील आहेत. अमेरिकेत सर्वाधिक विदेशी विद्यार्थी चीनचे आहेत. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना एफ-1 आणि एम-1 शेणीतील व्हिसा प्रदान केला जातो.
इमिग्रेशन अँड कस्टम इनफोर्समेंट डिपार्टमेंटने यासंबंधी आदेश काढला आहे. यानुसार पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्व वर्ग ऑनलाईन सुरू असलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परतावे लागणार आहे. महाविद्यालय किंवा विद्यापीठात जाण्याची गरज नसलेल्या विदेशी विद्यार्थ्यांनाच हा आदेश लागू होणार आहे. एखाद्या विदेशी विद्यार्थ्याने अमेरिका न सोडल्यास त्याला बळजबरीने मायदेशी पाठविले जाऊ शकते.
महामारीचा प्रभाव कमी करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. लाखो विद्यार्थी मायदेशी परतल्याने आरोग्य यंत्रणेवरील भार कमी होईल तसेच शासकीय निधीची बचत होणार आहे. परंतु अनेक देशांनी प्रवासबंदी किंवा अन्य निर्बंध लागू केले असल्याने अशा देशांच्या विद्यार्थ्यांसोबत काय करावे हे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.
अमेरिकेत 2 लाखांहून अधिक भारतीय शिकत आहेत. अन्य देशांमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना वंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत मायदेशात परत आणले जात आहे. अमेरिकेच्या नव्या आदेशासंबंधी भारताने अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. सर्व वर्ग ऑनलाईन करण्याचा निर्णय अद्याप विद्यापीठांनी घेतलेला नाही. हार्वर्ड विद्यापीठाने 40 टक्के विद्यार्थ्यांना प्रवेशाची मंजुरी देणार असल्याचे म्हटले आहे. 2018-19 च्या आकडेवारीनुसार चीनचे 3 लाख 69 हजार 548, भारताचे 2 लाख 20 हजार 14 तर दक्षिण कोरियाचे 52 हजार 250 विद्यार्थी अमेरिकेत सद्यकाळात शिकत आहेत.