डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विश्वास नसल्याचे डेमोक्रेट उमेदवार हॅरिस यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीच्या दरम्यान गुरुवारी पहिला आणि एकमात्र उपाध्यक्षीय वादविवाद सॉल्ट लेक शहरात पार पडला आहे. रिपब्लिकन पार्टीकडून उपाध्यक्ष माइक पेन्स आणि डेमोक्रेटिक पार्टीकडून उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी यात भाग घेतला. हॅरिस यांनी प्रारंभापासूनच आक्रमक भूमिका ठेवली होती. कोरोना नियंत्रणाप्रकरणी ट्रम्प प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असून याची हजारो उदाहरणे आहेत, असा शाब्दिक हल्ला त्यांनी चढविला आहे. यावर पेन्स यांनी चीनमधून येणाऱया लोकांना रोखून हजारो अमेरिकन नागरिकांचा जीव वाचविल्याचा दावा केला. ही चर्चा युएसए टुडेच्या सुसान पेज यांनी मॉडरेट केली आहे.
उपाध्यक्षीय वादविवादादरम्यान दोन्ही उमेदवारांसमोर प्रोटेक्शन ग्लासेस बसविण्यात आल्या होत्या. दोघांदरम्यान 12 फूटांचे अंतर राहिले आहे. पूर्वी हे अंतर 7 फूटची निश्चित करण्यात आले होते. पेन्स यांनी तत्पूर्वी ग्लासेस बसविण्यास विरोध दर्शविला होता, परंतु नंतर त्यांनी मान्यता दिली होती.
कोरोना महामारी
पेन्स : प्रत्येक गोष्टीसाठी हॅरिस अध्यक्ष ट्रम्प यांना गुन्हेगार ठरवत आहे. ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱया लोकांना रोखून ते किती कठोर निर्णय घेऊ शकतात, हे दाखवून दिले आहे. त्यांनी हजारो लोकांचा जीव वाचविला आहे.
हॅरिस : हे प्रशासन दुसऱयांदा निवडून येण्याच्या पात्रतेचे नाही. प्रशासनाने लोकांचा विश्वास गमाविला आहे. ट्रम्प प्रशासनाने महामारीचे सत्य लपविण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष महामारीला बनावट ठरवतात. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना 28 जानेवारी रोजीच यासंबंधी कळले होते. परंतु प्रशासन हातावर हात ठेवून बसून राहिले.
कोरोनावरील लस
पेन्स : कमला हॅरिस लसीच्या मुद्दय़ावरूनही राजकारण करत आहेत. या राजकारणातून लोकांना कुठला संदेश दिला जातोय? या मुद्दय़ावरील राजकारण त्वरित बंद केले जावे. हा लोकांच्या जीवनाशी संबंधित मुद्दा आहे.
हॅरिस : लस आली आणि अध्यक्ष ट्रम्प यांनी ती घेण्यास सांगितली तरीही मी ती घेणार नाही. परंतु डॉक्टरांनी लस घेण्यास सांगितल्यास सर्वप्रथम मीच तीच घेईल. परंतु ट्रम्प यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकत नाही.
अर्थव्यवस्था
पेन्स : ज्यो बिडेन यांची आर्थिक योजना लागू करताना चीनसमोर शरणागती पत्करावी लागणार आहे. डेमोक्रेटिक पार्टी चीनसमोर गुडघे टेकण्याची योजना मांडत आहे. कर कमी करणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 4 लोकांच्या कुटुंबांचे सरासरी वार्षिक उत्पन्न 4 हजार डॉलर्स झाले आहे. कर कमी केल्यानेच हे उत्पन्न वाढले आहे.
हॅरिस : बराक ओबामांच्या कार्यकाळात ओबामा केयर विधेयक आणले होते आणि त्याचा 2 कोटी नागरिकांना लाभ झाला होता. आरोग्य निर्देशांकात सुधारणा झाली होती. परंतु ट्रम्प आणि त्यांचे प्रशासन यावर टाळे ठोकत आहे. यातून अर्थव्यवस्थेवरील भार वाढणार आहे.
अमेरिका-चीन संबंध
पेन्स : अनेक वर्षांपासून बिडेन हे चीनच्या गळय़ातील ताईत ठरले आहेत. चीनवर निर्बंध लादले आणि कठोर कारवाई केली असता डेमोक्रेटिक पार्टी आणि बिडेन यांनी त्याला विरोध केला. कोरोना विषाणू फैलावण्यामागे चीनचा हात असल्याचे डेमोक्रेटिक पार्टी मानत नाही का?
हॅरिस : ट्रम्प यांच्या काळातच अमेरिका चीनसोबतच्या व्यापारयुद्धात पराभूत झाली आहे. देशातील शेतकरी दिवाळखोर होऊ लागले आहेत. निर्मितीच्या दृष्टीने अमेरिका मंदीच्या टप्प्यात पोहोचली आहे. देशातील रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत.
अमेरिकन नेतृत्व
पेन्स : इराणमध्ये आमच्या प्रशासनाच्या काळातच जनरल सुलेमानीचा खात्मा करण्यात आला. सुलेमानी हा अमेरिकेसाठी धोकादायक ठरला होता. आमच्या प्रशासनानेच इस्लामिक स्टेटचे अस्तित्व संपुष्टात आणले.
हॅरिस : अमेरिकेचे सहकारी आता ट्रम्प यांच्यापेक्षा क्षी जिनपिंग यांना आदर देतात. देशाने दिलेली आश्वासने पाळावीत. मित्रांना साथ दिली जावी. ट्रम्प यांनी मित्रांचा विश्वासघात केला आणि पुतीनसारख्या हुकुमशहाला मदत केली आहे.
वांशिक हिंसाचार
पेन्स : हिंसाचार कुठल्याही स्थितीत सहन केला जाणार नाही. जे घडले त्यासाठी कुठलेच कारण देणार नाही. परंतु कायदा अंमलबजावणी यंत्रणा बिगर श्वेतवर्णीयांसोबत भेदभाव करतात हे म्हणणे कायदा आणि यंत्रणांचा अपमान आहे.
हॅरिस : बिगर श्वेतवर्णीयांशी ट्रम्प भेदभाव करतात. त्यांनी न्यायालयात 50 जणांना नियुक्त केले आणि यातही एक बिगरश्वेतवर्णीय नाही. जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर हिंसाचार झाला. परंतु योग्य कारवाई करण्यात आली नाही.
ट्रम्प यांचे आरोग्य
अमेरिकेच्या अध्यक्षांच्या आरोग्यासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देण्यास पेन्स यांनी नकार दिला आहे. यासंबंधी अफवा पसरविल्या जात आहेत. आवश्यक असलेली माहिती दिली जात राहणार असल्याचे पेन्स म्हणाले. अध्यक्षांच्या आरोग्यासंबंधी माहिती देशासमोर मांडली जावी अशी मागणी हॅरिस यांनी केली आहे.