डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा निर्णय : भारतीय तंत्रज्ञांना बसणार फटका : कंपन्यांकडून विरोध
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-1बी व्हिसा समवेत विदेशी नागरिकांना नोकऱयांशी संबंधित दिले जाणारे अनेक व्हिसा निलंबित करण्याचा कालावधी वाढविला आहे. 31 डिसेंबरपर्यंत ग्रीनकार्ड आणि एच-1 बी व्हिसा प्रदान केला जाणार असल्याचे व्हाइट हाउसच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले आहे.
स्थलांतरित कर्मचाऱयांमुळेच गुगल आज अग्रेसर आहे. आम्ही स्थलांतरितांसोबत उभे राहू आणि त्यांना सर्वप्रकारची संधी मिळवून देण्यासाठी काम करत राहणार असल्याचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितले आहे.
गैरवापर रोखण्याचा निर्देश
ट्रम्प यांनी एच-1बी व्हिसाचा गैरवापर रोखण्याचाही निर्देश दिला आहे. व्हिसाशी संबंधित नियमांचे पालन न करणाऱया व्यक्तीच्या विरोधात अमेरिकेचे कामगार मंत्रालय कारवाई करणार आहे. परंतु अन्नप्रक्रिया उद्योग, वैद्यकीय आणि काही अन्य क्षेत्रांसाठी व्हिसा प्रदान करण्याची मंजुरी दिली जाऊ शकते.
बेरोजगारीचे निमित्त
अमेरिकेत महामारीमुळे बेरोजगारी दर अचानक वाढला आहे. बेरोजगारी संकट कमी करणे आणि नागरिकांचे रोजगार वाचविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत ही बंदी तात्पुरत्या स्वरुपाची आहे. यासंबंधी पुढील निर्णय अमेरिकेतील व्हिसा प्रक्रियेत सुधारणा केल्यावरच घेतला जाणार आहे. अन्य देशांमधून बदली होऊन येणाऱया कर्मचाऱयांना दिल्या जाणाऱया एल-1 व्हिसालाही स्थगिती देण्यात आली आहे.
5 लाख नोकऱयांवर प्रभाव
एच-1बी व्हिसासह एच-4, एच-2बी, जे आणि एल व्हिसा प्रदान करण्यावरही ट्रम्प बंदी घालू शकतात. अशाप्रकारच्या व्हिसासाठी सोडत पद्धत त्वरित बंद केली जावी असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. व्हिसाशी संबंधित नव्या निर्बंधांमुळे चालू वर्षाच्या अखेरपर्यंत 5.25 लाख नोकऱयांवर प्रभाव पडणार आहे.
भारतीयांना फटका एच-2बी व्हिसा वगळता अन्य सर्व व्हिसा स्थगित होण्याचा प्रभाव भारतीयांवर पडणार आहे. एच-2बी व्हिसा विशेषकरून मेक्सिकोच्या नागरिकांना उपयुक्त ठरतो. अमेरिकेत दरवर्षी 10 लाख कर्मचारी अन्य देशांमधून येत असतात. देशातील बेरोजगारी दर अधिक असल्याने विदेशी नागरिकांना व्हिसा देणे योग्य नसल्याचे अमेरिकेच्या खासदारांनी म्हटले आहे.