लॉयड ऑस्टीन यांच्या वर्णीचा ऐतिहासिक निर्णय
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्रिपदाची धुरा जनरल (निवृत्त) लॉयड ऑस्टीन यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. ते अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय संरक्षण मंत्री असणार आहेत. सैन्यात दमदार कामगिरी केल्यानंतर पेंटागॉनमध्ये संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणारे हे पहिलेच आफ्रिकन-अमेरिकन ठरले आहेत. अमेरिकेच्या दृष्टीने ही बाब निश्चितच ऐतिहासिक ठरणारी आहे.
बायडेन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आता सहकारी मंत्र्यांची निवड करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे. आरोग्यमंत्रिपदी कॅलिफोर्नियाचे ऍटर्नी जनरल झेवियर बेसेरा यांची नियुक्ती केली आहे. बेसेरा हे किफायतशीर आरोग्य देखभालीसंबंधी कायदा लागू करण्याच्या नीतीचे समर्थक आहेत. आता ते बायडेन प्रशासनामध्ये कोरोना संकटाविरोधात देशात सुरू असलेल्या मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.
लॉयड ऑस्टीन यांना युद्धभूमीचा प्रत्यक्ष अभ्यास
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रिपदासाठी अनेकांची नावे चर्चेत होती. त्यात लॉयड यांनी बाजी मारली आहे. युद्धभूमीवर सैन्याच्या एका तुकडीचे नेतृत्व करणारे लॉयड हे पहिले कृष्णवर्णीय जनरल होते. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडमधून 2016 मध्ये निवृत्त झालेले जनरल लॉयड ऑस्टीन हे संरक्षण मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार होते. संकटकाळात ते विश्वासास पात्र ठरल्यामुळेच बायडन यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी संपवली आहे. अमेरिकन लष्करातही त्यांना मानाचे स्थान आहे.