7 कोटी लोक अडचणीत: काही भागांमध्ये 12 इंच जाडीचा बर्फाचा थर जमा
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
अमेरिकेच्या ईस्ट कोस्टमध्ये हिमवादळ ‘केनान’ने मोठे नुकसान घडवून आणले आहे. वादळामुळे सुमारे 7 कोटी लोक संकटात सापडले आहेत. न्यूयॉर्क आणि बोस्टनमधील वीज गुल झाल्याने शहराचा वेग पूर्णपणे मंदावला आहे. न्यूयॉर्क, न्यू जर्सी, मेरीलँड, रोड आयलँड आणि व्हर्जिनिया प्रांतात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. या भागात 4 वर्षांनी तीव्र वादळ आले आहे.
न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यांवर देखील 4 इंचापेक्षा अधिक जाडीचा बर्फाचा थर जमा झाला आहे. शहराचे महापौर एरिक ऍडम्स यांनी सोशल मीडियावरून लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. ब्रुकलिनमध्ये व्यवसाय ठप्प झाला असून शहरामधील गल्ल्या निर्जन झाल्या आहेत. या आपत्तीतही लोक परस्परांना ‘स्नो डे’च्या शुभेच्छा देत आहेत.
न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी होचुल यांनी लोकांना अनावश्यक प्रवास टाळण्यास सांगितले आहे. याचबरोबर प्रवास करणे आवश्यक असलेल्या लोकांनी स्वतःसोबत ब्लँकेट, पाणी, अन्न आणि आवश्यक औषधे बाळगण्याची सूचना करण्यात आली आहे.
बोस्टनमध्ये स्नो इमर्जन्सी
बोस्टनमध्ये महापौर मिशेल वू यांनी देखील स्नो इमर्जन्सीची घोषणा केली आहे. स्थिती अत्यंत अधिक धोकादायक होणार आहे. हे एक ऐतिहासिक वादळ ठरू शकते असे त्यांनी म्हटले आहे. वादळादरम्यान 80 ते 120 मैल प्रतितासाच्या वेगाने वारे वाहू शकतात, यामुळे स्थिती अधिकच बिघडू शकते असे अमेरिकेच्या हवामान विभागाने म्हटले आहे. हिमवादळाचा प्रभाव हवाई वाहतुकीवरही पडला आहे. शनिवारी 3500 विमानोड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. रविवारसाठी 885 उड्डाणे पूर्वीच रद्द करण्यात आली आहेत.