पलायन करणाऱया हल्लेखोराला कंठस्नान
वृत्तसंस्था / सेन जोस
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातील सेन जोस शहरात बुधवारी एका व्यक्तीने बेछूट गोळीबार केला आहे. या गोळीबारात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून पलायन करू पाहणाऱया हल्लेखोराला पोलिसांनी कंठस्नान घातले आहे. शहराचे महापौर सॅम लिकार्डो यांनी या घटनेला शहराच्या इतिहासावरील कलंक ठरविले आहे. मृतांमध्ये भारतीय वंशाचा एक नागरिक आहे.
मृतांमधील बहुतांश जण ट्रान्सपोर्ट अथॉरिटीचे कर्मचारी आहेत. हे कर्मचारी सकाळी डय़ुटी संपवून घरी जाण्याची तयारी करत हेते अशी माहिती सांता क्लारा शेरिफ कार्यालयाने दिली आहे. या इमारतीत स्फोटके असल्याचा संशय पाहता तेथे बॉम्बविरोधी पथक पाचारण करण्यात आले होते. गोळीबाराच्या घटनेनंतर तेथील लोकल रेल्वे सेवा रोखण्यात आहे. पोलिसांनी हल्लेखोराची ओळख जाहीर केलेली नाही. तसेच गोळीबाराचे कारणही सांगण्यात आले नाही. प्रसारमाध्यमांनुसार रेल यार्डच्या कर्मचाऱयानेच हा गोळीबार केला आहे.