ऑनलाईन टीम / अयोध्या :
अयोध्येतील धन्नीपूर गावात बाबरी मशिदीच्या आकाराचीच भव्य मशिद बांधण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी कॉम्प्लेक्स आणि एक रुग्णालय देखील उभारण्यात येणार आहे. इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने उभारण्यात येणाऱ्या मशिदीचे संकल्पचित्र प्रसिद्ध केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मशिद आणि कॉम्प्लेक्ससाठी धन्नीपूर येथे 5 एकर जागा देण्याचे उत्तरप्रदेश सरकारला आदेश दिले होते. त्यानुसार सरकारने मशिदीसाठी पाच एकर जागा दिली आहे. या मशिदीच्या उभारणीसाठी इंडो इस्लामिक कल्चर ट्रस्टची स्थापनाही करण्यात आली. तसेच मशिद आणि कॉम्प्लेक्सच्या डिझाईनचे काम जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या आर्किटेक्चर विभागाचे प्रमुख एम. एस.अख्तर यांच्याकडे देण्यात आले आहे.
अख्तर यांनी मशिदीचे संकल्पचित्र तयार केले आहे. या डिझाईनला वेळीच परवानग्या मिळाल्या तर 26 जानेवारीपासून मशिदीचे काम सुरू होईल. पाच एकर जागेत तयार होणाऱ्या मशिदीजवळ रुग्णालय, एक ग्रंथालय, इंडो-इस्लामिक कल्चर संशोधन केंद्र (रिसर्च सेंटर), कम्युनिटी किचन, आणि संग्रहाल देखील उभारण्यात येणार आहे, असे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.