अचानक भेटीमुळे तर्कवितर्कांना ऊत
प्रतिनिधी /पणजी
‘आप’ नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज मंगळवारी अचानक गोव्यात येत असून त्यांच्या भेटीसंदर्भात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा सोमवारचा दौरा रद्द झाल्यानंतर केजरीवाल यांनी गोव्यात येण्याच्या घेतलेल्या निर्णयाने उत्कंठा वाढली आहे.
आपच्या एका पदाधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल हे आज मंगळवारी दुपारी 2.30 वा. दिल्लीहून गोव्यात येतील. गेले तीन दिवस ‘आप’ने काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या आमदारांच्या कृतीचा निषेध म्हणून त्यांच्या भाजप प्रवेशाला दोन वर्षे पूर्ण होताच प्रतिकात्मक निषेध म्हणून ‘केक’ देण्याचा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर नुवेचे आमदार बाबाशान यांनी मात्र आपल्या काही कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ‘आप’च्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर दिल्याने निर्माण झालेला गोंधळ व आपच्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांच्यासह सुमारे 200 जणांवर गुन्हे नोंदविल्याने त्याची गंभीर दखल केजरीवाल यांनी घेतली आणि त्यांनी अचानकपणे आपण गोव्यात येत असल्याचे व्टिटरवरुन जाहीर केले. दरम्यान, ‘आप’च्या एका पदाधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, एका राजकीय पक्षाच्या नेत्याकडे अरविंद केजरीवाल हे संभाव्य युती संदर्भात चर्चा करणार आहेत. शिवाय एक दोन मोठे नेते ‘आप’मध्ये प्रवेश करण्याचीही शक्यता आहे. आज दुपारी गोव्यात आल्यानंतर ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील व बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेतील.