ऑनलाईन टीम / इटानगर :
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी अरुणाचल प्रदेश सरकारने ‘यू टेल अस’ आणि ‘दुकान दादा’ ही दोन ॲप्स सुरू केली आहेत.
नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे यासाठी काही खासगी कंपन्यांनी ही ॲप्स विकसित केली असून, सरकारला यामुळे मोठे सहकार्य होत आहे. या ॲप्सच्या माध्यमातून नागरिकांना जीवनावश्यक वस्तू त्यांच्या घरापर्यंत पोहोचवल्या जात आहेत.
देशात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर अरुणाचल प्रदेश सरकारने 25 मार्चपासून ही ॲप्स सुरू केली आहेत. त्याचबरोबर ‘मी बडी’ आणि ‘एपिट्स’ ही दोन ॲप्स किराणा माल आणि मास्क, सॅनिटायझर यासारखा जीवनावश्यक वस्तूंसाठी सुरू करण्यात आली आहेत.
राज्यातील नागरिक आता ॲप्सवर जीवनावश्यक वस्तूंची मागणी नोंदवत आहेत. त्यानुसार त्यांना पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी असून, सोशल डिस्टन्सिंगही पाळले जात आहे, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.