ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अरुणाचल प्रदेशातील एका गावातून बेपत्ता झालेला मुलगा चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला सापडला आहे. त्याला परत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तेजपूर पीआरओ लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन पांडे यांनी दिली आहे.
पांडे म्हणाले, मिराम तारोन असे या 17 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो अरुणाचल प्रदेशातील सियुंगलाच्या अंतर्गत असलेल्या लुंगटा जोर भागातील रहिवाशी असून, तो 18 जानेवारी रोजी बेपत्ता झाला होता. त्यानंतर बुधवारी अरुणाचल प्रदेशचे खासदार तापीर गाओ यांनी भारतीय हद्दीतील अप्पर सियांग जिल्ह्यातून एका 17 वषीय किशोरवयीन मुलाचे पीएलएने अपहरण केल्याची माहिती ट्विटद्वारे दिली होती. दरम्यान, भारतीय लष्कराला तारोनबद्दल माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब हॉटलाइनद्वारे पीएलएशी संपर्क साधला आणि वनौषधी गोळा करणाऱ्या एका मुलाचा रस्ता चुकला असून, तो अद्याप सापडत नसल्याचे सांगितले होते.
मंगळवारपासून या मुलाचा शोध सुरू होता. अखेर चिनी लष्कराने आम्हाला कळवले आहे की त्यांना अरुणाचल प्रदेशमधून हरवलेला मुलगा सापडला आहे. आता त्याला परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही पांडे यांनी सांगितले.