अर्जेंटीनाच्या सरकारने कोरोना विषाणूच्या प्रकोपाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या वित्तसहाय्यासाठी धनाढय़ांवर कर लादला आहे. या निर्णयाचा फटका देशातील 12,000 धनाढय़ांना बसणार आहे. देशाच्या संसदेने यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या कराद्वारे प्राप्त होणाऱया रकमेचा वापर कोरोनाविरोधी युद्धात करण्यात आलेल्या उपाययोजनांसाठी होणार आहे.
या कराद्वारे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडीज यांच्या सरकारला 300 अब्ज पेसो (3.75 अब्ज डॉलर्स) प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.
कोरोनाचा मार
अर्जेंटीनाच्या 4.4 कोटी लोकसंख्येला कोरोना संकटाचा मोठा फटका बसला आहे. महामारीमुळे देशात बेरोजगारांची संख्या आणि दारिद्रय़ाचे प्रमाणही वाढले आहे. नव्या विधेयकानुसार 20 कोटी पेसोपेक्षा अधिक घोषित मालमत्ता असलेल्या लोकांनाच कर द्यावा लागणार आहे. त्यांना देशातील मालमत्तेवर 3.5 टक्के आणि विदेशातील मालमत्तेवर 5.25 टक्के कर भरावा लागणार आहे. यातून मिळणाऱया रकमेपैकी 20 टक्के वैद्यकीय पुरवठय़ासाठी, 20 टक्के छोटे आणि मध्यम व्यावसायिकांना मिळणार आहे. 15 टक्के रक्कम सामाजिक विकासावर खर्च होणार आहे. 20 टक्के शिष्यवृत्तीकरता वापरली जाणार आहे.